मोडनिंब : सीना-माढा उपसा सिंचन योजनेतील ४२ गावांसाठी पावणेपाच टीएमसी पाणी लागणार आहे. मात्र, आता इंदापूर भागातील गावांसाठी नव्याने पाच टीएमसी म्हणजे सीना-माढा उपसा सिंचन योजनेपेक्षा अधिक पाणी दिले जात आहे. ही बाब पूर्णपणे चुकीची असून, माढा तालुका व जिल्ह्यावर उजनी पाण्याच्या वाटपाबाबत अन्याय होत आहे. आमदार बबनराव शिंदे यांनी याविरोधात आंदोलन करावे, आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहू, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य भारत आबा शिंदे यांनी दिला.
उजनीच्या पाण्यावर बोलताना त्यांनी खंत व्यक्त कली. धरण उशाला अन् कोरड घशाला, अशी अवस्था माढा तालुक्यातील जनतेची झाली आहे. दुष्काळाशी झुंज देणाऱ्या शेतकऱ्यांना सीना-माढा उपसा सिंचन योजना व मोडनिंब वितरिकेच्या माध्यमातून पाणी मिळत आहे. काही भागात अजूनही कॅनाॅलचे काम पूर्ण झालेले नाही. उजनीच्या पाण्याची पळवापळवी जनता सहन करणार नसल्याचे शिंदे यांनी सांगितले.
धरण जिल्ह्यामध्ये असताना अनेक योजना निधीअभावी रखडल्या आहेत. या धरणातील गाळ काढून किंवा वाळू विकून पैसा उभा राहील. त्यामधून उजनी धरणाची पाण्याची क्षमताही वाढेल. कृष्णा-भीमा स्थिरीकरणसारखी योजना मंजूर करून त्या योजनेला निधी मंजूर करणे गरजेचे आहे. सीना-माढा उपसा सिंचन योजनेतून अंबाड, शिराळ, पिंपळकुटे, भोसरे, कुर्डू, बावी, अंजनगाव, तुळशी, परितेवाडी, परिते, घोटी, आहेरगाव व अकोले बुद्रुक ही गावे पाटाने भिजायची अद्याप राहिली असल्याची खंत शिंदे यांनी व्यक्त केली.
-----