सोलापूर - पाथरी (ता. उत्तर सोलापूर) येथे ९ मे २०१७ रोजी मधुकर गावडे यांचा घातक शस्त्रांनी खून करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपातून लिंगप्पा बंडगर, (रा. पाथरी ,ता. उत्तर सोलापूर) यांच्यासह ९ आरोपींची अति. सत्र न्यायाधीश श्री डी. के. अनभुले यांनी निर्दोष मुक्तता केली.
या खटल्याची हकीकत अशी की, यातील आरोपींना त्यांच्या शेतात जाण्यासाठी फिर्यादीच्या शेतातून जावे लागत होते. या वहिवाटीच्या कारणावरून आरोपी व फिर्यादी मध्ये वाद सुरू होता. घटनेदिवशी आरोपी लिंगप्पा बंडगर, लहू बंडगर, दरिअप्पा बंडगर, इंद्रजीत बंडगर, अमोल बंडगर, शिवाजी बंडगर, परमेश्वर बंडगर, अर्जुन बंडगर, अंकुश बंडगर (सर्व रा. पाथरी) यांनी तलवार, लोखंडी रॉड, काठ्यानी फिर्यादी मधुकर गावडे हा त्याच्या शेतात काम करत असताना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्याचेवर हल्ला करून त्यास जखमी केले तसेच त्याला वाचवायला आलेल्या त्याच्या कुटुंबातील सदस्यांना देखील जखमी केले असे सरकारपक्षाचे म्हणणे होते
खटल्याच्या सुनावणीच्या दरम्यान आपल्या युक्तिवादात आरोपीचे वकील ॲड. जयदीप माने यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की, वाटेच्या वहिवाटीच्या वादाचा निकाल उच्च न्यायालयापर्यंत आरोपींच्या बाजूने लागला आहे त्यामुळे फिर्यादीपक्षावर आरोपींनी हल्ला करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, याउलट फिर्यादी पक्षाच्या विरोधात वहिवाटीचा निकाल लागल्याने फिर्यादीने चिडून जाऊन आरोपींविरुद्ध खोटी केस दाखल केली आहे. आरोपीच्या घरातील आंधळ्या वृद्धास देखील गुंतवले आहे, घटनेदिवशी फिर्यादी याने आरोपी लिंगप्पा याच्यावर हल्ला केला, त्यामुळे आरोपी लिंगप्पा याचा जीव धोक्यात आल्याने आरोपी लिंगप्पा याने स्वतःचे स्व सौरक्षण केले, स्वसंरक्षणार्थ केलेले कृत्य गुन्हा होत नाही.
या खटल्यात आरोपींतर्फे ॲड. जयदीप माने, ॲड. विठोबा पुजारी, ॲड. विकास मोटे यांनी तर सरकारतर्फे ॲड. रामपूरे व मूळ फिर्यादीतर्फे ॲड. सूर्यवंशी यांनी काम पाहिले.