परिचारक गटातून बाजार समितीचे सभापती दिलीप घाडगे, भीमा व विठ्ठल परिवाराचे माधव चव्हाण, रामदास चव्हाण, भीमाचे संचालक तुषार चव्हाण, संतोष सुळे, युवासेनेचे योगेश चव्हाण, हणमंत चव्हाण या तीन गटांमध्ये मागील वेळी निवडणूक लागल्याने ही लढत तिरंगी झाली होती; मात्र युवा सेना व घाडगे गटाची युती झाल्याने ही निवडणूक दुरंगी होणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.
सुस्तेत ५२३३ लोकसंख्या आहे. तर २३२० पुरुष तर २०५० महिला असे ४३७० मतदार आहेत. यामध्ये १३ जागेसाठी २६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. गेल्या चाळीस वर्षांपासून विकास कामाच्या जोरावर व समाजाचे हित जोपासल्यामुळे पंढरपूर बाजार समितीचे सभापती दिलीप घाडगे यांची ग्रामपंचायतीवर एक हाती सत्ता आहे.
मागील वेळी भीमा व विठ्ठल परिवाराचा १३ पैकी एकही उमेदवार निवडून न आल्याने दारूण पराभव झाला होता. यावेळेस मात्र घाडगे गटातून प्रभाग क्रमांक तीनमधून निवडून आलेले अनंता चव्हाण व पंचायत समिती निवडणुकीत अवघ्या ३३ मताने पराभव झालेल्या सप्तशृंगी पतसंस्थेचे अध्यक्ष अतुल चव्हाण यांनी घाडगे गटाला सोडचिठ्ठी देऊन भीमा व विठ्ठल परिवाराशी मनोमिलन करून अंबिका देवीचा महाविकास परिवर्तन आघाडी स्थापन केली आहे. त्यामुळे भीमा व विठ्ठल परिवाराचा पाया भक्कम झाला असला तरी भीमा व विठ्ठल परिवाराकडून प्रभाग क्रमांक पाचमधून उमेदवारी लढलेले दत्तात्रय लोखंडे व प्रभाग क्रमांक चार वनिता लोखंडे यांनी भीमा-विठ्ठल परिवाराला बाय बाय करून युवासेनेत प्रवेश केला आहे.
घाडगे गटाच्या प्रभाग क्रमांक तीनमधील मैमून जहागीर यांनी मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर केले नसल्याने सदस्यत्व रद्द झाल्यामुळे पोटनिवडणूक लागली होती. या पोट निवडणुकीत घाडगे गटाने मनाचा मोठेपणा दाखवून युवासेनेच्या सीमा आंबेकर यांना बिनविरोध निवडून दिले होते. घाडगे गटाने युवासेनेचे योगेश चव्हाण व हणमंत चव्हाण यांना दोन जागा दिल्याने निवडणूक घाडगे गटाबरोबर एकत्र लढवणार असल्याचे युवासेनेचे जिल्हा प्रमुख योगेश चव्हाण यांनी सांगितले.
प्रभाग क्रमांक पाच हा सर्वसाधारण पुरूष व अनुसूचित जातीच्या महिलेसाठी खुला आहे, तसेच सरपंच पदाचे आरक्षण अनुसूचित जातीच्या महिलेसाठी निघणार असल्याची शक्यता असल्याने प्रभाग क्रमांक पाचमध्ये इच्छुकांनी उमेदवारी मिळवण्यासाठी पॅनेल प्रमुखाकडे फिल्डींग लावण्याचे काम सुरू आहे.
दरम्यान ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध करायची असेल तर आम्ही चर्चेला तयार असल्याचे बाजार समितीचे सभापती दिलीप घाडगे यांनी विचार विनीमय बैठकीत सांगितले आहे.