वानखेडेपेक्षा मोठे असलेल्या पार्क मैदानावर होतील आयपीएल अन् रणजी सामने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2020 11:58 AM2020-08-13T11:58:02+5:302020-08-13T12:01:34+5:30
स्मार्ट सिटीतून सुशोभिकरणाचे काम प्रगतीपथावर; वानखेडे मोठे आहे पार्क स्टेडियम...
सोलापूर : येथील इंदिरा गांधी स्टेडियमवर आयपीएल, रणजी सामने व्हावेत यासाठी स्मार्ट सिटी योजनेतून स्टेडियमचे सुशोभीकरण करण्यात येत आहे. २९ डिसेंबर २०१९ पासून सुरू झालेले हे काम आता प्रगतिपथावर आहे. भविष्यात नक्कीच आयपीएल अन् रणजी सामने या मैदानावर होतील असा विश्वास सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव चंद्रकांत रेम्बुर्स यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.
दरम्यान, एकूण ७.६१ कोटी रुपयांचा खर्च करून होत असलेल्या या मैदानावर सुशोभीकरणासह मैदानाच्या मध्यभागी ११ खेळपट्ट्या तर बाजूला सरावासाठी ८ खेळपट्ट्या तयार केल्या जात आहेत.
पार्कवरील ७२ मीटरच्या परिघात मैदान तयार केले जात आहे. यातील ३० मीटरच्या परिघात खेळपट्ट्या तयार केल्या जात आहेत. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमचा परीघ ६५ मीटर आहे. त्यापेक्षा सोलापूरचे स्टेडियम मोठे आहे. या स्टेडियमची २२ हजार प्रेक्षक क्षमता आहे.
खेळपट्टीसाठी विविध प्रकारचे थर रचण्यात आले आहेत. त्यावर ३० टक्के लाल माती, ३० टक्के काळी माती व शेणखत, ४० टक्के पोयटा माती वापरण्यात आली आहे. सध्या माती पसरविण्यासह संपूर्ण मैदानात बर्मुडा ग्रास लावण्याचे काम सुरू आहे.
पुण्याचे कृष्णाई कन्स्ट्रक्शन काम करीत आहे. कामाच्या गुणवत्तेसाठी भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक लालचंद रजपूत, टीम इंडियाचे क्युरेटर पांडुरंग साळगावकर, राहुल खलाटे हे अभियंत्यांना नियमित मार्गदर्शन करीत आहेत. स्मार्ट सिटीचे सीईओ पी. शिवशंकर, मुख्य तांत्रिक अधिकारी संजय धनशेट्टी, उपमुख्य तांत्रिक अधिकारी तपन डंके कामावर लक्ष ठेवून आहेत.