सोलापूर-बार्शीमधील ७० किमीचे अंतर पोहोचायला लागतात साडेतीन तास
By Appasaheb.patil | Published: November 12, 2019 11:01 AM2019-11-12T11:01:14+5:302019-11-12T11:03:02+5:30
रस्त्यावर पडले मोठमोठे खड्डे; सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष; खड्ड्यांमुळे वाहनचालकांचा ताबा सुटतो अन् घडतो अपघात
सुजल पाटील
सोलापूर : सोलापूर ते बार्शी हे ७० किलोमीटरचे अंतर... सोलापूरहून बार्शीला पोहोचण्यासाठी साहजिकच दीड तासाचा अवधी पुरेसा... मात्र मागील सहा महिन्यांपासून या रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे सोलापूरहून बार्शीला पोहोचायला तब्बल तीन ते साडेतीन तास लागतात़ एवढेच नव्हे तर या रस्त्यावरील खड्ड्यात गाड्या आदळून वाहनचालकांचा गाडीवरचा ताबा सुटतो अन् अपघात होतो़ हे आता नित्याचेच बनले आहे़ त्वरित रस्ता दुरुस्त करावा, अन्यथा रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा परिसरातील संस्था, संघटना व ग्रामस्थांनी उत्तर सोलापूर तालुका सार्वजनिक बांधकाम विभागाला दिला आहे.
रस्त्यावर पडलेले खड्डे़़़ नियमित होणारे किरकोळ अपघात अन् संबंधित अधिकाºयांचे दुर्लक्ष हे सोलापूर-बार्शी मार्गावरील असलेल्या प्रत्येक गावातील ग्रामस्थांसाठी काही नवं नाही़ सध्या सोलापूर-बार्शी मार्गावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत़ त्यामुळे वाहनधारकांना या मार्गावरून आपलं घर गाठताना मरणाच्या दाढेतून जातोय की काय, अशी प्रचिती येत आहे़ सोलापूर-बार्शी या महामार्गावरील चाळण झालेल्या रस्त्यामुळे वाहनधारकांना जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागत आहे. त्यामधूनही दररोज एखाद् दुसरा लहान-मोठा अपघात होत आहे तर काही जणांना अपंगत्व आलेले आहे.
सोलापूर-बार्शी या महामार्गावरील रस्त्याची वाट लागलेली असताना अधिकारी व पदाधिकारी संवेदनशील नसल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. सोलापूरहून बार्शीकडे निघाले असता मार्डी फाट्यापासून बार्शीपर्यंत रस्ता खराब झालेला आहे़ यातच गुळवंची, कारंबा, नान्नज, वडाळा, राळेरास, शेळगाव, वैराग परिसरात मोठमोठे खड्डे पडलेले आहेत़ या खड्ड्यातून मार्ग काढताना दुचाकी, चारचाकी व मालवाहतूक गाड्यांच्या वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
गाड्यांचे होतेय नुकसान
सोलापूर-बार्शी मार्गावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे़ सातत्याने खड्ड्यांचा सामना करणाºया वाहनधारकांच्या गाड्यांचेही नुकसान होत आहे़ एवढेच नव्हे तर खड्ड्यात गाडी आदळल्यामुळे गाडीचा ताबा सुटून दररोज छोटे-मोठे अपघात होत आहेत़ या मार्गावरून जाणाºया एसटी महामंडळाच्या गाड्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचे एसटीचालक गजानन सुतार यांनी सांगितले़
सोलापूर-बार्शी रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत, हे खरे आहे़ मात्र पावसामुळे रस्ता दुरुस्त करण्यास अडचण येत होती़ आता मागील दोन-तीन दिवसांपासून पाऊस बंद झाला असून, आजपासून रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येईल़ सोलापूर ते वडाळ्यापर्यंतचे खड्डे बुजविण्यात येतील़
- संभाजी धोत्रे, कार्यकारी अभियंता,
सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक १, सोलापूर
मागील काही दिवसांपूर्वी उत्तरचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रमुख जेऊरकर यांना रस्ता दुरुस्त करण्यासंदर्भात निवेदन दिले होते़ त्यावेळी त्यांनी दोन ते तीन दिवसात खड्डे बुजविण्याचे आश्वासन दिले होते़ मात्र निवेदन देऊन सात दिवस उलटले तरीही या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात बांधकाम विभागाला यश आले नाही़ येत्या काही दिवसात रस्ता दुरुस्त न झाल्यास नाईलाजास्तव रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल़
- प्रा. विनायक सुतार, रहिवासी, कारंबा
गेल्या वर्षभरापासून या रस्त्याची वाट लागली आहे़ नवा रस्ता होणाऱ़़ नवा रस्ता होणार हेच सांगण्यात येत आहे़ मात्र नवा रस्ताच काय पण जुन्या रस्त्याची दुरुस्तीही करता आली नाही़ सोलापूर-बार्शी महामार्गावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे अनेकांना जीव गमवावा लागत आहे़ दररोज छोटे-मोठे अपघात होत आहेत़ त्वरित रस्ता दुरुस्तीचे काम हाती घ्यावे, अन्यथा रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल़
- फिरोज पठाण,
सचिव, मौलाना आझाद विचार मंच, अकोलेकाटी.