पोलीस सूत्रांकडील माहितीनुसार मोडनिंब येथे सावळेश्वर टोल नाक्याच्या वतीने महामार्गाचे काम सुरू आहे. या कामावर असलेला जेसीबीचालक (वय ३२) व त्याच्यासोबत ट्रॅक्टरचालक असे दोघे काम करत होते. २२ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या दरम्यान सायंकाळी काम संपवून ते दाेघे दुचाकीने मोहोळकडे येताना देवडी गावाजवळ पुणे-मोहोळ महामार्गावर पाठीमागून आलेल्या टँकरने (एमएच १२ आरएन १६९१) दुचाकीला जोराची धडक दिली. त्यामध्ये दुचाकीचालकाच्या अंगावरून टँकरचे चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांच्यासोबत असलेला जाेडीदार जखमी झाला. अपघातानंतर ट्रकचालक पळून गेला.
याप्रकरणी अनोळखी चालकाविरोधात योगेश वाघमारे यांनी मोहोळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. तपासात काही संशयित घटना लक्षात आल्याने पोलीस निरीक्षक सायकर यांच्या सूचनेनुसार पथकाने जेसीबीचालक तसेच टँकरचा चालकाबाबत अधिक चौकशी केली.
संशयितांचे मोबाइल फोन तपासले असता पोलिसांचा संशय बळावत गेला. त्यामुळे जेसीबी चालकाची आणि अन्य एका महिलेची माहिती गोळा केली. यामध्ये टँकरचालक दादासाहेब करंडे याचे त्या महिलेशी अनैतिक संबंध होते. यासंबंधांना जेसीबीचालकाने विरोध केल्याने संबंधित महिला आणि प्रियकर यांनी संगनमत करून पतीच्या दुचाकीला टँकरने पाठीमागून अंगावर घालून जीवे ठार मारले. या अपघातात प्रियकर आणि त्याच्या प्रेयसी विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक धनाजी खापरे करीत आहेत.