- यशवंत सादूल सोलापूर : एका पक्ष्याने चक्क ३१ हजारांहून अधिक किलोमीटरचा प्रवास केल्याचे समोर आले आहे. हिवाळ्यामध्ये युरोप, रशिया, कझाकिस्तान येथून स्थलांतर करीत सोलापुरात ‘भोवत्या’ हा पक्षी येत असतो. या पक्ष्याचा अभ्यास करण्यासाठी चार वर्षांपूर्वी ‘गंगी’ या माँट्युग्यू भोवत्या पक्ष्याला सोलापुरात टॅग लावण्यात आला होता. चार वर्षांत ‘भोवत्या’ पक्ष्याने सोलापूर ते कझाकिस्तान असा एकूण ३१ हजार ८०० किलोमीटरचा प्रवास केला आहे. या दरम्यान हा पक्षी चौथ्यांदा सोलापूर जिल्ह्यातील गंगेवाडी येथे परतला. स्थलांतर करणाऱ्या भोवत्या पक्ष्याचा शास्त्रीयददृष्ट्या अभ्यास करण्यासाठी बंगळुरू येथील ‘एट्री’ व सोलापुरातील नेचर कॉन्झर्व्हेशन सर्कलने पुढाकार घेतला आहे. हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात हजेरी लावणारे भोवत्या किंवा हरीण पक्ष्यांचे थवे हे सोलापुरात दिसतात. कझाकिस्तानहून निघालेले हे पक्षी भारतात राजस्थान, गुजरातमार्गे महाराष्ट्रातील नाशिक आणि सोलापुरात येतात. पुढे दक्षिणेकडील राज्यात जाताना जास्त काळ येथे मुक्कामी असतात. ३१ हजार ८०० किलोमीटरचा प्रवास करणाऱ्या या पक्ष्याचे छायाचित्र पक्षिमित्र नागेश राव यांनी टॅगसह काढले आहे. एट्री संस्थेच्या पक्षितज्ज्ञांनी मागील आठवड्यात अशा तीन पक्ष्यांना जीएसएम सोलार टॅग लावून नान्नज पक्षी अभयारण्य परिसरात निसर्गाच्या सान्निध्यात सोडून दिले. ४,५०० किलोमीटरचा प्रवास करून पिल्लाने गाठले सोलापूर पक्षी अभ्यासकांनी यंदा सोलापुरातून तीन पक्ष्यांना टॅग लावले असून, दोन वयस्क आहेत. तिसरे नऊ महिन्यांचे पिल्लू आहे. त्याने साडेचार हजार किलोमीटरचा प्रवास करून सोलापूर गाठले आहे.या पक्ष्यांना ‘भोवत्या’ किंवा ‘हरीण’ का म्हणतात? पॅलिड हॅरिअर या परदेशी पक्ष्याचे नाव त्याच्या विहारावरून ठरले आहे. हा पक्षी आपले अन्न आणि भक्ष्य असलेल्या परिसराभोवतीच सारखा घिरट्या मारत असतो, म्हणून त्याला ‘भोवत्या’ म्हणतात. गवताळ माळरानातील सावज हेरून हरणाच्या चपळतेने, सफाईदारपणे शिकार करण्याच्या वैशिष्ट्यामुळे त्याला ‘हरीण’ असेही म्हणतात.
सोलापुरी टॅग लावून ‘गंगी’चा ३१,८०० किलोमीटर प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2021 7:28 AM