पंढरपूर : गेल्या दोन वर्षांपासून कोरोना संकटामुळे आषाढीसह अन्य यात्रा मोठ्या प्रमाणात भरविण्यास शासनाने परवानगी नाकारली होती. परंतु यंदा मात्र कार्तिकी यात्रेचा सोहळा भरविण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे. यात्रा कालावधीमध्ये मंदिरामध्ये कोविड-१९ प्रतिबंधात्मक नियमावलींचे काटेकोर पालन करण्याचे आवाहनही प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
विठ्ठलाच्या नित्योपचाराचा भाग म्हणून कार्तिकी यात्रेच्या ६ ते २४ नोव्हेंबर या कालावधीत विठ्ठलाचा पलंग काढण्यात येणार आहे. या कालावधीत विठ्ठलाचे दर्शन भाविकांसाठी २४ तास खुले राहील. दिंड्यांमध्ये येणाऱ्या भाविकांनी मागणी केल्यास त्यांना ६५ एकर परिसरात उतरण्यास परवानगी देण्यात येणार आहे. चंद्रभागा वाळवंटामध्ये १४ ते १६ नोव्हेंबर या तीन दिवसांमध्ये मंडप टाकून कीर्तन, प्रवचन कार्यक्रमांना परवानगी देण्यात आली आहे. कार्तिकी यात्रा कालावधीमध्ये मंदिरामध्ये कोविड-१९ प्रतिबंधात्मक नियमावलींचे काटेकोर पालन केले जावे, असे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे.
उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते महापूजा
उपमुख्यमंत्री अजित पवार व मानाचे वारकरी यांचे हस्ते सपत्नीक विठ्ठलाची शासकीय महापूजा कार्तिकी एकादशीला पहाटे २.२० ते ३ वाजेपर्यंत होणार आहे. कार्तिकी एकादशी दिवशीच्या रथोत्सवालाही गर्दी न करता कोरोना नियमावलींचे पालन करण्याच्या अटीवर परवानगी देण्यात आली आहे.
]पंतप्रधान आज करणार पालखी मार्गाचे भूमिपूजन
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आभासी पद्धतीने आज, सोमवारी भूमिपूजन होणार आहे. पंढरपूर येथे होणाऱ्या या कार्यक्रमास केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांचीही उपस्थिती असणार आहे.