धक्कादायक; सोन्याच्या हव्यासापोटी मृतदेहाची हाडे अन् माती नेली चोरून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2020 12:12 PM2020-01-08T12:12:12+5:302020-01-08T12:19:31+5:30
पंढरपुरातील प्रकार; मातीत हाडे निघण्याऐवजी निघाले खिळे
पंढरपूर : पंढरपूर येथील स्मशानभूमीत एखाद्या मृतदेहाचे दहन केल्यानंतर त्याचा तिसरा दिवस होण्यापूर्वीच त्या दहन केलेल्या मृतदेहाची हाडे व माती सोन्याच्या हव्यासापोटी चोरून नेली जात आहे. त्यामुळे मृत्यूनंतरही मृतदेहाची अवहेलना व विटंबना होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार उघड झाल्यानंतर या माती चोरांनी दुसरीच पाटीभर माती त्याठिकाणी आणून टाकली. मात्र त्या मातीत हाडे निघण्याऐवजी खिळे निघाल्याने मयताचे नातेवाईकही अचंबित झाले. हा प्रकार रोखण्यासाठी स्मशानभूमीत आता सीसीटीव्ही बसविण्याची मागणी होत आहे.
पंढरपूर येथे गेल्या दोन दिवसांपूर्वी स्मशानभूमीत एका मयत व्यक्तीचे दहन केले होते. दहन केल्यानंतर दुसºया दिवशी नातेवाईक त्या ठिकाणी गेले असता दहन केलेली जागा पूर्णपणे मोकळी व साफ करून ठेवल्याचे निदर्शनास आले. मात्र हेच नातेवाईक तिसºया दिवशी त्याठिकाणी माती सावडण्यासाठी येणार असल्याचे माती चोरी करणाºयांच्या लक्षात आले. म्हणून त्यांनी झालेल्या प्रकाराची वाच्यता टाळण्यासाठी ऐन रात्रीत एक पाटीभर इतर ठिकाणची माती आणून टाकली. माती सावडत असताना मयताचे नातेवाईक मयत झालेल्या व्यक्तीची हाडे, राख आपल्या शेतात समाधी बांधण्यासाठी ठेवत असतात. मात्र या ठिकाणी माती सावडताना नातेवाईकांना त्या मातीमध्ये एक लोखंडी रॉड आढळून आल्याने हाडांशिवाय त्या ठिकाणी हा रॉड कोठून आला, त्यामुळे नातेवाईकही अचंबित झाले.
झालेला प्रकार त्यांनी जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांच्या निदर्शनास आणून दिला व मयत झालेल्या व्यक्तीचा अपघात झाला नव्हता, कोणतेही हाड फ्रॅक्चर नव्हते मग त्यांच्या मातीमध्ये हा लोखंडी रॉड कोठून आला, असा प्रश्न उपस्थित केला. या नातेवाईकांनी उद्विग्न होत आमच्या नातेवाईकाच्या मातीचे विसर्जन न करता दुसºयाच्या मातीचे विसर्जन करण्याची वेळ आल्याचे त्यांनी सांगितले.
याबाबतचे लेखी निवेदन पंढरपूरचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांना जनहित शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आले आहे. सीसीटीव्ही कॅमेरे न लावल्यास मुख्याधिकाºयांसमोर मृतदेह ठेवण्याचा इशाराही त्यांनी या निवेदनाद्वारे दिला आहे. त्यामुळे नगरपालिका कोणती भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे.
यावेळी प्रभाकर देशमुख, राजाभाऊ हबाळे, ज्ञानेश्वर भोसले, सुरेश नवले, श्रीकांत नलवडे, संतोष कांबळे, विशाल वाकसे, मारूती भुसनर, सूरज गुटाळ, अमिन शेख, सचिन आटकळे, सचिन भुसे, आप्पा भुई, नाना शेंडगे, संदीप शिंदे, राजू सुरवसे, सुनील तुपसौंदर, सचिन कारंडे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महिलांच्या मृतदेहाच्या राखेची सर्वाधिक चोरी
- पंढरपूर स्मशानभूमीत हा प्रकार गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने घडत आहे. मात्र याबाबत कोणीही आवाज उठविताना दिसत नाही. राख चोरी करताना महिलांच्या मृतदेहाची राख चोरी होत असल्याचा प्रकारही समोर आला आहे. त्यामुळे पंढरपुरातील सर्वसामान्य जनतेमध्ये या प्रकाराबाबत संताप व्यक्त केला जात आहे. हा प्रकार कायमस्वरूपी थांबवायचा असेल तर पंढरपूर स्मशानभूमीत कायमस्वरूपी २४ तास सुरू असणारे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी सामाजिक संघटनांमधून होत आहे. तरच हा घृणास्पद प्रकार थांबून मृतदेहाची मृत्यूनंतर होणारी विटंबना थांबेल.
स्मशानभूमीतून राखेची चोरी होणे हा प्रकार गंभीर आहे. आम्ही स्मशानभूमीच्या ठिकाणी सुरक्षा रक्षक नेमणे विचाराधिन आहे. पंढरपूर शहरात सीसीटीव्हीबाबतचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. शासनाकडून मंजुरी मिळताच याबाबतचे काम हाती घेण्यात येणार आहे.
- अनिकेत मानोरकर
मुख्याधिकारी