खाकीचा हुंकार, ‘सोलापूरची प्रतिमा जपू !’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 12:23 PM2019-06-24T12:23:23+5:302019-06-24T12:25:59+5:30
‘लोकमत’च्या चर्चेतील सूर : लोकांनीही जाणून घ्यावेत वाहतुकीचे नियम; जनजागृतीची गरज
सोलापूर : तीर्थक्षेत्र पंढरपूर, अक्कलकोट, तुळजापूर, गाणगापूर, श्री सिद्धरामेश्वर मंदिर आदी ठिकाणी दर्शनासाठी बाहेरून येणाºया वाहनांची कायद्याने तपासणी केली जाते. कोणत्या ना कोणत्या कारणास्तव दंड लावला जातो़ यामुळे बाहेरील प्रवासी व पर्यटकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. सोलापूरच्या प्रतिमेवर जिल्ह्याचा विकास अवलंबून आहे, तो मलिन होण्यापासून थांबविला पाहिजे, असा सूर शहरातील मान्यवरांमधून निघाला. यावर जिल्ह्यातील विविध विभागाच्या पोलीस अधिकाºयांनी शहराची प्रतिमा जपण्याचा हुंकार भरला.
सोलापूर जिल्हा हा कर्नाटक व आंध्र प्रदेशच्या सीमावर्ती भागावर आहे. जिल्ह्यात धार्मिक पर्यटनस्थळे आहेत़ त्यासाठी महाराष्ट्रातून, देशभरातून लोक इथे येत असतात. प्रवाशांना टोलनाका व जकात नाक्याच्या ठिकाणी अडवून कागदपत्रांची मागणी केली जाते. वाहतूक शाखेच्या पोलिसांचा ग्रुप मोठ्या प्रमाणात थांबून अशा कारवाया करत असल्याने एक चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. बाहेरून येणारे प्रवासी सोलापुरात येण्यास टाळत आहेत, येथील पोलीस अडवतात, अरेरावीची भाषा करतात. कायदेशीर कागदपत्रे दाखविली तरी दंडात्मक कारवाई करतात, अशी भीती प्रवाशांत निर्माण झाली आहे. ‘लोकमत’ टीमने शहराच्या बाहेरील राष्ट्रीय महामार्ग व राज्य महामार्गावर स्टिंग आॅपरेशन करून हा प्रकार उजेडात आणला होता.
प्रवाशांची होणारी लूट आणि शहराच्या अर्थकारणावर होणारा परिणाम यावर ‘लोकमत’ने १९ जून २0१९ पासून मालिका चालवली होती. प्रत्यक्ष महामार्गांवर परगावांवरून आलेल्या प्रवाशांच्या मुलाखती घेतल्या होत्या. मालवाहतूक करणाºया चालकांच्या प्रतिक्रिया मिळविल्या होत्या. शहर व जिल्ह्यातील उद्योगांवर याचा कसा परिणाम होत आहे, यावर हॉटेल व्यावसायिक, कापड व्यापारी आदींची मते जाणून घेतली होती. एकंदरीत या सर्व बाबींवर विचार मंथन करण्यासाठी लोकमत कार्यालयात ‘कॉफी टेबल’चे आयोजन करण्यात आले होते. कॉफी टेबलसाठी वालचंद कॉलेजचे प्रा. नरेंद्र काटीकर, चादर कारखानदार राजेश गोसकी, संगमेश्वर महाविद्यालयातील पर्यटन विभागाचे प्रा. राजकुमार मोहोरकर, वाहतूकदार संघाचे मिलिंद म्हेत्रे, शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक कमलाकर पाटील, जिल्हा ग्रामीण वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक विजया कुर्री, महामार्ग पोलीस केंद्राचे सहायक पोलीस निरीक्षक रमेश भंडारे यांना आमंत्रित करण्यात आले होते. सर्व मान्यवरांनी पर्यटक व प्रवाशांना होणाºया त्रासाबाबत माहिती सांगून सोलापूरच्या विकासासाठी काय आवश्यक आहे यावर आपली मते मांडली़
प्रवाशांच्या भावनेचा विचार करा
बाहेरून येणाºया प्रवाशांच्या मनात सोलापूरची प्रतिमा सकारात्मक बनली पाहिजे. सध्या सोलापूरकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत आहे. संवादाचा अभाव दिसून येत आहे़ महामार्गावरून येणाºया वाहनचालकांना चांगली वागणूक दिली पाहिजे. प्रवासात कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे याची माहिती वाहनचालकांना असली पाहिजे. लोकांमध्ये गोंधळ निर्माण झालेला असतो, एखादी व्यक्ती सोलापुरात येत असताना त्याच्या भावनेचा विचार करावा.
- प्रा. नरेंद्र काटीकर
वालचंद महाविद्यालय
उद्योगांमुळे शहराचा विकास
कोणत्याही शहराचा विकास हा तेथील उद्योगांवर अवलंबून असतो. सोलापुरात चादर, टॉवेलचे कारखाने असून, विक्रीचे शोरूम्स् आहेत. पर्यटन स्थळ असल्याने बाहेरून येणाºया प्रवाशांची संख्याही मोठी आहे. लोक आवर्जून टॉवेल व चादरी घेऊन जातात़ महाराष्ट्रातून, देशातून आणि परदेशातून जेव्हा हे लोक आमच्याकडे येतात तेव्हा गाड्या अडविल्याची खंत व्यक्त करतात. एकही वाहन चुकीच्या दिशेने जात नाही अशी इमेज सोलापूरच्या वाहतूक व्यवस्थेची निर्माण झाली पाहिजे. इमेज निर्माण झाल्यास सोलापूरचा विकास होण्यास मदत होईल.
- राजेश गोसकी, चादर कारखानदार
पर्यटकांमुळे विकासाला हातभार
सोलापूर हे एकेकाळी आशिया खंडातील चौथ्या क्रमांकाचे शहर होते. आज पुण्याची लोकसंख्या एक कोटीच्या घरात गेली आहे़ याचे कारण असे की, सोलापूरचा तरूण रोजगारासाठी तेथे स्थायिक होत आहे. सोलापुरात शंभर अशी ठिकाणे आहेत, जिथे पर्यटनस्थळ म्हणून विकास होऊ शकतो. पर्यटकांची संख्या जेव्हा वाढेल तेव्हा सोलापूरचा विकास आपोआप होईल. पुण्या-मुंबईकडे जाणाºया तरूणांचा लोंढा थांबेल. राजकीय नेत्यांनीही याकडे लक्ष दिले पाहिजे. सोलापूरची प्रतिमा चांगली निर्माण व्हावी यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत.
- प्रा. राजकुमार मोहोरकर, संगमेश्वर महाविद्यालय
सीटबेल्टचा वापर केला पाहिजे !
कोणत्याही प्रवाशाच्या जीवनाचा अंत अपघाताने होऊ नये, अशी आमची भावना आहे. वाहनामध्ये नियमापेक्षा जास्त व्यक्ती बसू नयेत, सर्व कागदपत्रे सोबत असावीत म्हणजे आम्हाला त्रास होत नाही. किमान चालकाने सीटबेल्टचा वापर केला पाहिजे. या गोष्टीसाठी आम्ही वाहने तपासतो. अनेक प्रवाशांना नियम माहीत नसतात़ चुकीच्या दिशेने येतात व जीव गमावतात. वेळेत सर्व गोष्टी करण्यासाठी वेगाने वाहन चालवतात़ अशांना आम्ही ई-चलनाने पावती देतो. प्रवाशांची काळजी म्हणूनच आम्ही गाड्या थांबवितो.
- रमेश भंडारे, पोलीस निरीक्षक, महामार्ग
प्रत्येकाने नियमांचे पालन केले पाहिजे !
बाहेरून प्रवासी शहरात येतात, सार्वजनिक रस्त्यांवर गाडी पार्क करतात. स्थानिक लोकांचा कॉल आला की आम्हाला कारवाई करावी लागते. मे महिन्यात एम.एच-१३ च्या ७ हजार ३१५ वाहनांवर कारवाई केली आहे. ३६१ गाड्या अन्य जिल्ह्यांतील व राज्यांतील आहेत. शहरातील व्यापाºयांनी पार्किंगची सोय केली पाहिजे, रस्त्यांवर अडथळा होणार नाही, वाहतुकीच्या नियमांबाबत म्हणावी तशी जनजागृती झाली नाही. सोलापूरला पर्यटकांचा लोंढा कमी झाला असे म्हटले जाते, मात्र त्याला इतर कारणे आहेत. याला केवळ वाहतूक शाखाच जबाबदार नाही.
- कमलाकर पाटील, पोलीस निरीक्षक, शहर वाहतूक शाखा
वाहनांची एकदाच तपासणी व्हावी
सोलापुरात परगावांवरून येणाºया ट्रॅव्हल्सवाल्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे. आंध्रप्रदेश, कर्नाटक, लातूर, उस्मानाबाद आदी भागांतून प्रवासी मोठ्या प्रमाणात सोलापुरात येतात. वाहतूक शाखेच्या पोलिसांकडून त्यांची तपासणी होते. नियमानुसार जी तपासणी होणे आवश्यक आहे ती व्हावी, मात्र ती दोन ते तीन ठिकाणी होऊ नये. जिल्ह्यात किंवा शहरात एकाच ठिकाणी तपासणी व्हावी. पुढे पुन्हा पुन्हा तोच प्रकार होऊ नये.
- मिलिंद म्हेत्रे
सदस्य, वाहतूक सल्लागार समिती