मुलांनो एसटी बसची वाट पाहूच नका; मिळेल त्या गाडीतून परीक्षेला पोहोचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2022 05:54 PM2022-03-02T17:54:02+5:302022-03-02T17:54:08+5:30
दहावी-बारावीसाठी एसटीचे नियोजन नाही; पालकच पोहोचवतील मुलांना परीक्षा केंद्रावर
सोलापूर - आंदोलनामुळे एसटीचे वाहक व चालक पूर्ण क्षमतेने कामावर रूजू झालेले नाहीत. आहे तेवढ्याच वाहक-चालकांवर काही प्रमाणात एसटी बस महत्त्वाच्या मार्गावर धावत आहेत. दहावी व बारावीच्या परीक्षेसाठी विशेष बाब म्हणून एसटी विभागाने कोणत्याही प्रकारचे नियोजन केले नाही. दरम्यान, मुलांनो खासगी गाड्यांचा आधार घ्या नाहीतर पालकांच्या गाडीवर बसून परीक्षा केंद्रावर पोहोचा असा सल्ला एसटीच्या एका अधिकाऱ्यानं दिला आहे.
बारावीची लेखी परीक्षा चार मार्चपासून तर दहावीची १५ मार्चपासून सुरू होणार आहे. त्यासाठी विद्यार्थी अभ्यासाला लागले आहेत. शिवाय परीक्षा केंद्राची व्यवस्था करण्यासाठी सोलापूर जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग रात्रंदिवस काम करीत आहे. एसटी बसने नियमित शाळेला गेलेले विद्यार्थी यंदा परीक्षा काळात एसटी बसच्या प्रवासाला मुकणार आहेत. आंदोलनामुळे पूर्ण क्षमतेने एसटी बस सुरू नाहीत, शिवाय परीक्षेच्या वेळेला उपयोगी पडणारी एकही एसटी बस धावत नसल्याने दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांची यंदाच्या वर्षी परीक्षेला जाताना मोठी अडचण निर्माण होत आहे.
----------
- एकूण परीक्षा केंद्र - ९०९
- विद्यार्थी संख्या- ६२७५३ (दहावी)
- विद्यार्थी संख्या - ५८००० (बारावी)
----------
दहावी-बारावी परीक्षेची तयारी अंतिम टप्प्यात आहे. परीक्षा केंद्र सर्व सुविधा पुरविण्याचा प्रयत्न जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाकडून सुरू आहे. परीक्षा केंद्रे सज्ज ठेवण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही, त्यासाठी शिक्षण विभाग पूर्ण तयारी करीत आहे.
- अशोक भांजे] शिक्षणविस्तार अधिकारी, परीक्षा समन्वयक, साेलापूर
------------
परीक्षा केंद्रावर असणार भरारी पथकांचा वॉच...
माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (दहावी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (बारावी) परीक्षा मार्च - एप्रिलमध्ये होत आहेत. जिल्हाधिकारी, माध्यमिक शिक्षणाधिकारी, प्राथमिक शिक्षणाधिकारी, निरंतर शिक्षणाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. हे पथक कॉफीमुक्त अभियान राबविणार आहेत.
-----------
आंदोलनामुळे वाहक-चालक पूर्ण क्षमतेने कामावर रुजू झाले नाहीत. जेवढे वाहक-चालक रुजू झाले आहेत, तेवढ्या प्रमाणातच एसटी बस मार्गावर धावत आहेत. दहावी-बारावीसाठी वेगळे असे कोणतेही नियोजन नाही. दरम्यान, आहे त्या गाड्यांमधून विद्यार्थ्यांना वेळेत परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
- विलास राठोड, विभाग नियंत्रक, एसटी विभाग, सोलापूर