जाणून घ्या...क़ुर्डूवाडीतील ब्रिटिशकालीन चर्चच्या इमारतीचा इतिहास...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2018 12:16 PM2018-12-25T12:16:28+5:302018-12-25T12:19:26+5:30
इरफान शेख कुर्डूवाडी : कुर्डूवाडी शहर मेरी ख्रिसमसच्या आगमनासाठी सज्ज झाले आहे. ब्रिटिश काळापासूनच्या असलेल्या या शहरातील चर्चच्या जुन्या ...
इरफान शेख
कुर्डूवाडी : कुर्डूवाडी शहर मेरी ख्रिसमसच्या आगमनासाठी सज्ज झाले आहे. ब्रिटिश काळापासूनच्या असलेल्या या शहरातील चर्चच्या जुन्या इमारती विद्युत दिव्यांच्या रोषणाईने सजल्या आहेत. आबालवृद्धांना आता सांताक्लॉजच्या आगमनाची प्रतीक्षा लागून असलेली दिसत आहे.
शहरातील सेंट मेरीज चर्च सर्वात जुने असून, सध्या सेंट अॅन्थोनी चर्च, डब्लू.एम.ई. चर्च व लहान कळप, इम्मानुएल चर्च असे शहरात पाच व माढा येथे एक असे सहा चर्च आहेत. ख्रिसमससाठी सर्वत्र जोरदार तयारी सुरु आहे. विद्युत रोषणाईसह ख्र्रिसमस ट्री, कॅरलसिंगिंग (ख्रिस्तजन्माची सुवार्ता), ख्रिस्त जन्म नाटिका, ख्रिस्ती कीर्तन, ख्रिस्ती कव्वाली, भक्तीगीत, नृत्य आदींचीही जय्यत तयारी ख्रिस्तबांधव करीत आहेत.
सेंट अॅन्थोनी चर्च
- - हे रोमन कॅथलिक चर्च असून, हेसुद्धा ब्रिटिशकालीन इसवी सन १९२४ मधील आहे. संत अॅन्थोनी हे या चर्चचे आदर्श आहेत. याची रचना पूर्ण काळ्या दगडात असून, चिरेबंदी चर्च आहे. यातील बेंचेस, क्रॉस, स्टॅच्यू सागवानी असून, जशाच्या तशा स्वरुपात आहेत़ यांचे धर्मगुरु रेव्ह.फादर जॉन कन्नीकैराज आहेत. दररोज भक्ती होते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणासाठी कॉन्व्हेन्ट स्कूल सुरु करण्यात आले आहे.
सेंट मेरीज चर्च
- - सेंट मेरीज चर्चची स्थापना १५ जुलै १८१८ साली करण्यात आली होती. हे चर्च ब्रिटिशकालीन असून, याची रचना पोर्तुगीज धर्तीची आहे. तेव्हापासून आजतागायत या चर्चची शान जशीच्या तशी आहे. याचे बांधकामही विलोभनीय आहे. रेल्वे कॉलनीच्या मध्यभागी हे चर्च असून, प्रत्येक रविवारी येथे भक्ती उपासना होते. रेव्हं. विल्सन पंडित हे मंडळींचे पालक आहेत. शहरातील सर्वात जुने सभासद या चर्चचे आहेत.
लहान कळप चर्च
- - स्व.रेव्ह.आर.एस.काळे हे रेल्वेत नोकरी करत असताना घरातूनच मिळालेले बाळकडू घेऊन स्वत:च्या सायकलवर खेडोपाडी जाऊन सुवार्ताचा प्रसार करुन स्वत:चे लहान कळप नावाचे चर्च खुले केले. प्रतिकूल परिस्थितीमध्ये ४० लोकांचा परिवार घेऊन सुवार्ताचा प्रसार केला. त्याचा वारसा त्याच जागेमध्ये त्यांचा धाकटा मुलगा शरद रतन काळे यांनी चालविला. या चर्चचे चालक म्हणून रेव्ह. साळवे आहेत. त्यांची भक्ती दर रविवारी सकाळी असते.
डब्लू.एम.ई.चर्च
- - डब्लू.एम.ई या चर्चची स्थापना १९८० साली झाली. येथे फादर निवास, मुलांसाठी हॉल व चर्च अशा तीन इमारती आहेत. त्याचे चालक रेव्ह. परमजोती सादे असून यांची भक्ती बुधवार, शुक्रवार व रविवारी उपवास आणि प्रार्थनेने होते. कॅरल सिंगिंग म्हणजे ख्रिस्ती बांधवांच्या घरी जाऊन जन्मोत्सवाची सुवार्ता देण्यात येते. यासोबतच ख्रिस्ती नाटिका, नृत्य असे कार्यक्रम पार पाडतात.
इम्मानुएल चर्च
- - या चर्चची स्थापना ८ जुलै २०१८ साली रेव्ह. याकोब नवगिरे व रेव्ह.डेव्हिड बागूल यांनी आदर्शनगर येथे केली आहे. दर रविवार सकाळी व शुक्रवारी सायंकाळी प्रार्थना असते. इतर दिवशी ख्रिस्त बांधव व विश्वासनारे यांच्या घरी जाऊन प्रार्थना करण्यात येते.
माढा चर्च माढा
- - या चर्चची स्थापना १९८० साली रावडे गुरुजी यांनी केली. यासाठी अनेकांनी योगदान दिले असून, रविवारी सकाळी व शुक्रवारी सायंकाळी प्रार्थना करण्यात येते. ख्रिसमसचेही विविध कार्यक्रमांचे आयोजन येथे करण्यात येते़