सोलापूर/मुंबई - रायगड, रत्नागिरीसह कोकणात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेकांनी आपला जीव गमावला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी तात्काळी महाड येथील दुर्घटनास्थळाला भेट देत नागरिकांना धीर दिला, अनेकांचं सांत्वन केलं. तसेच, येथील नागरिकांच्या पुनर्वसनाची जबाबदारी सरकारची असून त्यासाठी आराखडा आखण्यात येईल, असेही स्पष्ट केले. तर, दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोकणवासीयांची सध्याची गरज ओळखून 1 हजार सोलापूरी चादरी कोकणाला पाठवल्या आहेत.
कोकणातील भयानक पूरपरिस्थितीमुळे कोकणी बांधव अडचणीत आले आहेत. त्यांच्या मदतीसाठी महाराष्ट्र पुढे सरकतोय. विशेष म्हणजे अभिनेता भरत जाधव यानेही युथ फॉर डेमोक्रसी कॅम्पेनद्वारे मदतीचे आवाहन केले आहे. आता, सोलापूरच्या चादरी कोकणवासीयांना मायेची उब देणार आहे. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा... या कवितेतील पंक्तीप्रमाणे कोकणवासीय पुन्हा नव्या घरट्यांसाठी जोमाने कामाला लागणार आहेत. मात्र, सध्या त्यांना मदतीची गरज आहे. कोकणवासीयांची हीच गरज ओळखून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशनुसार सोलापूरातून 1 हजार चादरी कोकणला रवाना झाल्या आहेत. मनसे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांच्यावतीने ही एक हजार सोलापुरी चादरींची मदत कोकणला देण्यात येत आहे.
भरत जाधवनेही केलं मदतीचं आवाहन
कोकणात सध्या संसार उद्धवस्त झालेल्या नागरिकांना मदतीची गरज आहे, त्यांना आज वस्तू आणि अन्नधान्याची गरज आहे. त्यामुळेच, मराठमोळा अभिनेता आणि कोकणचा पुत्र भरत जाधव पुढे सरसावला आहे. भरत जाधवने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये 'युथ फॉर डेमॉक्रसी', असे तरुणाईला आणि नेटीझन्सला कोकणाच्या मदतीसाठी पुढे येण्याचं आवाहन केलंय. आपल्या कोकणाला देऊया मदतीचा हात, जास्त दिवस टिकतील असे सुके पदार्थ (सुका मेवा, फरसाण, वेफर्स, बिस्कीट, खजूर). कुटुंबातील महिला व पुरुषांना लागणारी सर्व प्रकारची अंतर वस्त्रे, जीवनावश्यक वस्तू, अंथरून-पांघरुण देण्यासाठी भरत जाधवने मदतीची हाक दिली आहे.