कोयत्यानं खुनी हल्ला करणाऱ्या दोघांना पकडले, रात्रीत केली मोहीम फत्ते
By विलास जळकोटकर | Published: August 27, 2023 05:20 PM2023-08-27T17:20:13+5:302023-08-27T17:20:29+5:30
न्यायालयानं सुनावली दोन दिवसांची पोलीस कोठडी.
सोलापूर : पैसे देण्यास नकार देणाऱ्यावर कोयत्यानं खुनी हल्ला करुन गंभीर जखमी करणाऱ्या दोघांना सदर बझार पोलीस ठाण्याच्या पथकानं सापळा रचून दोघांना शनिवारी सेटलमेंट परिसरातून अटक केली. त्यांना न्यायालयापुढे उभे केले असता दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. धीरज उर्फ आशुतोष अशोक जाधव (वय - २४ वर्षे), अनिल नागेश गायकवाड (रा. सलगरवस्ती, डोणगाव रोड, सोलापूर) अशी दोघांची नावे आहेत.
गेल्या महिन्यात ३० जुलै रोजी सायंकाळी फिर्यादी शिवानंद जाधव (रा. सेटलमेंट फ्री कॉलनी नं. ४) याला मोदी स्मशानभूमीत गाठून अनिल नागेश गायकवाड, धीरज अशोक जाधव, नागेश शवरप्पा गायकवाड, प्रदीप यल्लपा जाधव उर्फ वाघे जाधव यांनी पैशाची मागणी करून कोयत्याने व लोखंडी पाईपने खुनी हल्ला केला होता.
मारहाणीनंतर सर्व आरोपी पळून गेले होते. त्यांचा सतत शोध सुरू होता. त्यामुळे सदर बझार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राघवेंद्रसिंह क्षीरसागर यांनी २५ ऑगस्ट रोजी गुंडा पथक स्थापन केले होते. त्यामध्ये हवालदार संतोष पापडे पोलीस, तिमिर गायकवाड,विठ्ठल चिदानंद काळजे, हनुमंत पुजारी, परशुराम मेत्रे यांची नियुक्ती केली. हे पथक स्थापन करताच हवालदार संतोष पापडे यांनी सूत्रे हलवून धीरज जाधव व अनिल गायकवाड या आरोपींचा शोध घेऊन एका रात्रीत त्यांना सेटलमेंट भागातून शिताफीने पकडले. त्यांना न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. सोमवारी त्यांना न्यायालयात उभे केले जाणार आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकोलीकर करत आहेत.