पूर्वभागातील श्रमिकाच्या मुलीचं नृत्य अन् अभिनयात कौशल्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2019 04:36 PM2019-11-14T16:36:25+5:302019-11-14T16:39:06+5:30
बालदिन विशेष...
बाळकृष्ण दोड्डी
सोलापूर : पूर्वभागातील आशा मराठी विद्यालयात इयत्ता सहावीत शिकणारी धनश्री नागेश कोल्हापुरे हिने नाटक, नृत्य आणि शॉर्टफिल्ममध्ये कामे केलीत़ उत्कृष्ट अशा नृत्य आणि अभिनयातून तिने अनेक पारितोषिके पटकाविली आहेत. धनश्री ही सर्वसामान्य परिवारातील आहे़ आई शिवणकाम करते तर वडील खासगी नोकरी करतात़ घरची परिस्थिती जेमतेम आहे़, असे असले तरी तिला तिच्या अभिनय आणि नृत्य क्षेत्रात उत्कृष्ट कलावंत म्हणून श्रीमंत व्हायचं आहे़ त्यादृष्टीने तिची वाटचाल सुरू आहे. तिच्या स्वप्नपूर्तीसाठी ती त्यादृष्टीने परिश्रम घेत आहे़ नीलम श्रमजीवी नगरातील रहिवाशांना तिचे कौतुक आणि कुतूहल आहे़.
धनश्रीचे अभिनय कौतुकास्पद आहे़ सहज सुंदर नृत्य आणि संवादफेक कौशल्य वाखाणण्याजोगे आहे़ ती दहा वर्षांची आहे़ तिच्या आशा आकांक्षा मात्र गगनभेदी आहेत़ इतक्या कमी वयात तिने नृत्याच्या अनेक स्पर्धांमध्ये सहभाग घेतला़ केवळ सहभाग घेऊन ती थांबली नाही़, तर अनेक स्पर्धांवर तिने विशेष पारितोषिकांची नोंद केली़ नृत्यासोबत तिने नाटक आणि शॉर्टफिल्ममध्येही कामे केली़ मदर्स डे आणि आयडेंटीटी या नाटकातील तिच्या काही मिनिटाच्या अभिनयाने प्रेक्षकांकडून विशेष दाद मिळवली तसेच तिने किचक्या या शॉर्टफिल्ममध्येही अभिनय केला आहे़ तसेच रांगोळी आणि मेहंदी कलेत ती पारंगत आहे़ विशेष म्हणजे तिच्या घरातून अभिनयाचा कोणताही वारसा नाही़ ती श्रमिकाची मुलगी आहे़ तिला तिच्या परिस्थितीची तिळमात्र खंत नाही़ आई-वडिलांच्या सहकार्यातून तिला भविष्यात अभिनय आणि नृत्य क्षेत्रात खूप मोठी मजल घ्यायची आहे़ नृत्यांगना म्हणून तिला एक वेगळी ओळख निर्माण करायची आहे़ याकरिता तिला भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक हारुन पठाण, मुख्याध्यापिका तस्लीमबानो पठाण आणि तिचे वर्गशिक्षक शिवानंद हिरेमठ तसेच शाळेतील सर्व शिक्षकांकडून तिला विशेष सहकार्य मिळत आहे़
धनश्रीला मिळालेले पुरस्कार
- आयडेंटीटी एकांकिका स्पर्धा : उत्कृष्ट अभिनयाचे राज्यस्तरीय पारितोषिक - झी युवाकडून आयोजित डान्य महाराष्ट्र डान्स स्पर्धा : राज्यस्तरीय विशेष पुरस्कार
- सोलापूर लिटल चॅम्प डान्स स्पर्धा : प्रथम क्रमांक
- डान्स सोलापूर डान्स : प्रथम क्रमांक
- आॅल डान्सर्स असोसिएशनची स्पर्धा : प्रथम क्रमांक - नटराज नृत्य - ----- विद्यालयाची स्पर्धा : विशेष सन्मानपत्र
- नाट्यप्रसिद्ध अभिनेते मोहन जोशी यांच्याकडून विशेष प्रशंसा
धनश्री खूप प्रामाणिक आहे़ ती खूप मेहनती आहे़ वारंवार ती कुठल्या ना कुठल्या स्पर्धेत भाग घेत असते आणि पारितोषिकदेखील पटकावते़ शाळेकडून देखील तिला विशेष सहकार्य असतेच़ नीलम नगरातील बहुतांश गरीब मुलांना आम्ही नेहमी प्रोत्साहन देत असतो़ येथील मुलं खूप हुशार आणि कष्टाळू आहेत़ या सर्वांना धनश्री आयडॉल म्हणून पुढे येत आहे़
- तस्लीमबानो पठाण
मुख्याध्यापिका, आशा मराठी विद्यालय