शेवटच्या तीन दिवसांत होणार अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 04:16 AM2020-12-27T04:16:41+5:302020-12-27T04:16:41+5:30
उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आता शेवटचे सोमवार, मंगळवार आणि बुधवार असे तीनच दिवस शिल्लक आहेत़ गावागावात स्थानिक गट-तट ...
उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आता शेवटचे सोमवार, मंगळवार आणि बुधवार असे तीनच दिवस शिल्लक आहेत़ गावागावात स्थानिक गट-तट उमेदवारांची शोधाशोध करण्यात व्यस्त झाले आहेत़ रात्री उशिरापर्यंत गावोगावी पारावर गप्पा रंगू लागल्या आहेत़ सरपंचपद निश्चित नसल्यामुळे खर्चाचा देखील मोठा पेच निर्माण झाला आहे़ प्रत्येक पॅनलप्रमुख हा समोरच्या बाजूने कोणाला उमेदवारी देली जातेय, याकडे लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे कोणीच आपले पत्ते ओपन करण्यास तयार नाहीत. ऑनलाइन अर्ज दाखल करून ठेवण्याची प्रक्रिया ही सुरूच आहे़
वैरागच्या निवडणुकीबाबत संभ्रमावस्था
वैराग ग्रामपंचायत राहणार की नगरपंचायत होणार, याबाबत ग्रामस्थ, पॅनलप्रमुख, पदाधिकारी यांच्यात संभ्रमावस्था आहे. या निवडणुकीमध्ये मोठा पेच निर्माण झाला आहे़ त्यामुळे अर्ज दाखल करायचे नाही, याविषयी चर्चा सुरू आहे़ गावातील भूमकर व निंबाळकर या दोन्ही गटांकडून कोणीच उमेदवारी अर्ज दाखल करायचे नाहीत, असे ठरल्याचे समजते. जर अर्जच नाही दाखल झाले तर निवडणूक पुढे जाईल. दरम्यानच्या कालावधीत नगरपंचायत करण्याची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होईल, असा मतप्रवाह पुढे येऊ लागला आहे़ त्यामुळे या तीन दिवसांत वैरागमध्ये नेमके काय होणार, याबाबत सर्वांना उत्सुकता लागली आहे़
निवडणूक होणारी मोठी गावे
बार्शी तालुक्यातील उपळाई ठोंगे, पांगरी, मालवंडी, गौडगाव, आगळगाव, शेळगाव, रातंजन, सारोळे, नारी, खामगाव, चिखर्डे, कव्हे, कोरफळे, श्रीपतपिंपरी, खांडवी, मालवंडी, बावी या ११, १३ व १५ सदस्य संख्या असलेल्या गावात निवडणुका होत आहेत़