येत्या ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये नगर परिषदेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. करमाळा शहरात आतापासूनच निवडणुकीची व्यूव्हरचना आखली जाऊ लागली आहे. नगराध्यक्षपदाची निवड ही थेट मतदारातून न होता नगरसेवकातून होणार आहे. वॉर्ड रचना व प्रारूप मतदार याद्या तयार होण्याच्या अगोदरच इच्छुकांनी निवडणूकपूर्व मोर्चेबांधणी करायला सुरुवात केली आहे.
करमाळा नगर परिषदेत जगताप यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस व बागलांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने गत पंचवार्षिक निवडणुकीत सत्ता संपादन केली होती, पण महिनाभराच्या आतच आघाडीत बिघाडी झाली. बागल गटाने जगताप गटाबरोबर फारकत घेतली. नगर परिषदेत जगताप गटाचे चार, नागरिक संघटनेचे दोन सावंत गटाचे तीन व घुमरे गटाचा एक तर बागल गटाचे सात नगरसेवक असे बलाबल आहे. सध्या नगर परिषदेत माजी आमदार जयवंतराव जगताप यांचे चिरंजीव वैभवराजे जगताप नगराध्यक्ष आहेत, तर बागल गट विरोधात आहे.
बदलत्या राजकीय समीकरणानुसार सावंत गटाने जगताप गटाबरोबर असलेली आपली राजकीय नाळ तोडलेली असली तरी तालुक्याच्या राजकारणात आमदार संजयमामा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सावंत गट कार्यरत आहे, तर जयवंतराव जगताप, आमदार संजयमामा शिंदे यांच्याबरोबर राजकारणात सक्रिय आहेत. संजयमामा दोघात कसा मेळ घालतात याविषयी चर्चा आहे.
----
बागल म्हणतात स्वबळावर..
नगर परिषदेत सर्वाधिक सात नगरसेवक असलेला बागल गट होऊ घातलेल्या निवडणुकीत स्व:बळावर लढणार असल्याचे दिग्वीजय बागल यांनी बोलून दाखविले असले तरी समर्थक कार्यकर्ते जगताप गटाकडून पालिकेची सत्ता हिसकावून घेण्यासाठी सर्व विरोधकांना एकत्रित करून लढण्याची भाषा बोलत आहेत. सत्ताधारी जगताप गटाने शहरात विकासकामांचा धडाका लावलेला असून, शहरातील सर्वच प्रमुख रस्त्यासह गल्लीबोळात रस्त्यांची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. शिवसेना, भाजप व मनसेने नगर परिषदेची जोरदार तयारी सुरू केली आहे.
-----
जयवंतराव जगताप
दिग्विजय बागल
संजयमामा शिंदे
कन्हय्यालाल देवी
संजय सावंत
---