सोलापूर : संपूर्ण सोलापूर जिल्ह्याला पुणे येथून रोज पाचशे मालवाहतूक गाड्यांमधून जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरु आहे. पुणे-सोलापूर हायवेवरील सर्व ढाबे, हॉटेल्स, दुकाने बंद असल्याने या मालवाहतूक चालकांना पुणे ते सोलापूरपर्यंत येताना कपभर चहाही मिळत नाही. तसेच जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करताना पुणे-सोलापूर हायवेवरील चौकशीचा ससेमिरा कमी झाला असला तरी इतर अनेक अडचणी मालवाहतूकदारांसमोर आहेत.
प्रति गाडीमागे त्यांना २000 रुपये टोल खर्च येत आहे. त्यामुळे लवकरात लवकर टोलमाफी व्हावी, अशी मागणी पुणे मालवाहतूकदार संघटनेचे सचिव अनिल चाकोते यांनी केली आहे.पुणे येथील फुरसंगी परिसरात १00 औषध कंपन्यांची मोठ्या प्रमाणात गोदामे आहेत. सोलापूर जिल्ह्याला औषध पुरवठा येथूनच सुरू आहे. औषधांसोबत धान्य तसेच इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठाही पुणे येथून सोलापूरला होत आहे. रोज चारशे ते पाचशे मालवाहतूक गाड्यांमधून हा पुरवठा सुरू आहे. प्रत्येक गाडीमागे वाहनचालक आणि हेल्पर अशा दोन व्यक्तींचा समावेश असतो.
लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या काळात मालवाहतूक करताना प्रत्येक ठिकाणी गाडी मागे चौकशीचा ससेमिरा होता. चौकशीची कटकट सध्या बंद असून पण मालवाहतूक गाड्यांना टोलची सक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक गाडीला पुणे ते सोलापूर आणि सोलापूर ते पुणे येताना एकूण दोन हजार रुपयांचा टोल भरावा लागतोय. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारे मालवाहतूकदार आणि चालक हे सध्या कोरोना विरोधात वॉरियर्स म्हणून काम करत आहेत. मालवाहतूक गाड्यांना टोल माफी असावी. तसेच काही विशिष्ट ठिकाणी प्रशासनाकडून चालकांना जेवणाची व्यवस्था व्हावी. सध्या पाच ते दहा टक्के कर्मचाºयांकडून मालपुरवठा सुरू आहे, प्रशासनाकडून कर्मचाºयांची संख्या वाढवून मिळावी. सर्व कर्मचाºयांना संरक्षण कीट देण्यात यावे तसेच त्यांच्या आरोग्याची तपासणीही व्हावी, अशी मागणी पुणे मालवाहतूकदार संघटनेकडून करण्यात आली आहे.
वाहतूकदारांना सूट हवी- चाकोते- सध्याचा काळा आणीबाणीचा आहे. औषधांसह सर्व जीवनावश्यक वस्तू वेळेवर पोहोचवणे गरजेचे आहे. सर्व मालवाहतूकदार आणि चालक वॉरियर्स म्हणून काम करताहेत. रेग्युलरपेक्षा सध्या फक्त तीस टक्के मालवाहतूक सुरू आहे. म्हणजे उर्वरित ७0 टक्के मालवाहतूक ठप्प आहे. त्यामुळे मालवाहतूकदारांचा आर्थिक कणा मोडला गेला आहे. बँकांचे हप्ते थकीत आहेत. मालवाहतूक उद्योगावर अवलंबून असलेल्या हजारो कर्मचाºयांची रोजीरोटी देखील उडाली आहे. मालवाहतूकदारांना शासनाकडून आर्थिक मदतीची अपेक्षा आहे. तसेच बँकांच्या हप्त्यात तीन महिन्यांची सुट हवी आहे, अशी मागणी पुणे मालवाहतूकदार संघटनेचे सचिव अनिल चाकोते यांनी केली आहे.