संजय शिंदे सोलापूर : डावखुºया व्यक्तींमध्ये सकारात्मक व सर्वांगाने विचार करण्याची क्षमता अधिक असते. एवढेच नव्हे तर कल्पनाशक्ती त्याचप्रमाणे गणित, चित्रकला यातही ते पुढेच असतात. त्यांचे अक्षरही चांगले असते, असे मत सोलापूर लेफ्ट हॅण्ड असोसिएशनचे माजी अध्यक्ष प्रा. डॉ. शिरीष आहेरकर यांनी ‘लोकमत’ शी बोलताना व्यक्त केले.
१३ आॅगस्ट हा दिवस जागतिक डावखुरे दिन अर्थात वर्ल्ड लेफ्ट हॅण्ड डे म्हणून साजरा केला जातो. त्या पार्श्वभूमीवर प्रा. आहेरकर डावखुºया व्यक्तींचे गुणविशेष सांगत होते. समाजामध्ये डावखुºया व्यक्तींविषयीचे मत आता पहिल्यापेक्षा सकारात्मक होत असल्याचे सांगतानाच पूजा करताना मात्र आजही उजव्या हाताचाच वापर करण्यात येत असल्याचे डॉ. आहेरकर सांगतात.
डावखुºया लोकांच्या मेंदूची विचारक्षमता इतरांपेक्षा अधिक वेगवान असल्यामुळे एकापेक्षा जास्त कामामध्ये ते तरबेज असतात. दैनंदिन जीवनात याचा त्यांना खूप फायदा होतो. आपल्या मेंदूचे डावा आणि उजवा असे दोन भाग असतात. संशोधकांच्या मते डावखुºया लोकांमध्ये मेंदूच्या दोन्ही भागांचा समन्वय अधिक जलद आणि चांगल्याप्रकारे होतो. त्यामुळे वेगवेगळे काम करताना त्यांची गफलत होत नाही.
डाव्या लोकांना कलात्मकतेचे वरदान लाभलेले असते. एका संशोधनातून असे दिसून आले आहे की, विद्यापीठातील डावे विद्यार्थी दृश्यस्वरूपाच्या विषयांत भाषात्मक विषयांच्या तुलनेत अधिक चांगली कामगिरी करतात आणि त्यामुळे त्या विषयांत पदवी ग्रहण करण्याची त्यांची शक्यता जास्त असते. लिओनार्दाे दा विंची, मायकलेंजेलो, राफायल आणि रेम्ब्रँटसारखे महान कलाकार डावखुरेच होते.
गुणसूत्रावर डावखुरेपणा...- मानवी शरीरातील गुणसूत्रे ही त्यांच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावत असतात. आॅक्सफर्ड विद्यापीठातील संशोधक ब्रिस्टॉल आणि हॉलंडमधील मॅक्स प्लक इन्स्टिट्यूटमधील संशोधकांच्या संशोधनानुसार गर्भाशयामध्ये विकसित होत असलेल्या गर्भाच्या गुणसूत्रात असमतोलपणा निर्माण झाल्यास त्याचा परिणाम संबंधित व्यक्ती डावखुरा किंवा उजवा होण्यावर होतो.
डावखुºयांसाठी अनेक वस्तूंची निर्मिती- उजवे असणारे कुठलीही वस्तू सहजपणे हाताळतात. मात्र डावखुºयांसाठी ती अडचणीची ठरते. डावखुºयांसाठी इस्त्री, कात्री, आॅर्गन (बुलबुल), गिटार, तबला त्याचप्रमाणे टाईपरायटर की-बोर्ड अशा वस्तू आता बाजारात उपलब्ध आहेत.