शेतीची कामे पूर्वपदावर येत असताना पुन्हा बिबट्याचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 04:12 AM2020-12-28T04:12:51+5:302020-12-28T04:12:51+5:30
वांगी नं. १ व बिटरगाव शिवारात वावरत असलेल्या बिबट्याची माहिती शेतकऱ्यांनी वनविभागास वारंवार कळवूनही ते दुर्लक्ष करीत असल्याची तक्रार ...
वांगी नं. १ व बिटरगाव शिवारात वावरत असलेल्या बिबट्याची माहिती शेतकऱ्यांनी वनविभागास वारंवार कळवूनही ते दुर्लक्ष करीत असल्याची तक्रार होत आहे. १८ डिसेंबर रोजी वनविभागाच्या कारवाईत तिघांचे बळी घेतलेल्या नरभक्षक बिबट्यास गोळ्या घालून ठार केले. त्यानंतर वांगी, बिटरगाव, चिखलठाण, शेटफळ या परिसरातील शेतकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला असताना व १५ दिवसापासून खोळंबून राहिलेली शेतीची कामे व गावातील दैनंदिन जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत होते. दरम्यान, २२ डिसेंबर रोजी वांगी नं. १ येथे धनाजी देशमुख यांना सायंकाळी ६.३० वाजता शेतीत ट्रॅक्टरद्वारे मशागत सुरू असताना ट्रॅक्टर उजेडात बिबट्या दिसला. त्यानंतर २५ डिसेंबर रोजी वांगी नं. १ येथेच मयूर जाधव यांच्या वस्तीवर पाळीव चार श्वानांवर हल्ला करून ठार मारले.
२६ डिसेंबर रोजी सायंकाळी ६.४५ वाजता बिटरगाव येथे रामा रोडगे यांच्या केळीच्या बागेजवळ शोभा सरडे व रामा रोडगे यांना तो वावरत असताना दिसून आला. त्यापूर्वी सकाळी वांगी नं. १ येथे गॅस गोडावूनमधून गॅस टाक्या वाटप करणारऱ्या कामगारास त्याने दर्शन दिले. एक बिबट्या मारल्यानंतर दुसरा बिबट्या वारंवार वांगी नं. १ व बिटरगाव शिवारात दिसून येत असल्याने शेतकरी दहशतीखाली वावरत आहेत. शेतीची कामे पुन्हा ठप्प होण्याच्या मार्गावर आहेत. शेतात पिकांना पाणी द्यायला व खुरपणी करायला शेतकरी चार ते पाच जणांच्या टोळीने जात आहेत तर जनावरांच्या गोठ्याला रात्रभर राखण करावे लागत असल्याचे शेतकरी सांगत आहेत.
मादी बिबट्या शरीराने जाडजूड
वांगी नं. १ व बिटरगाव येथे दिसून आलेला बिबट्या मारला गेला. तो नरभक्षक बिबट्यापेक्षा खूपच जाड असल्याचे प्रत्यक्षदर्शी धनाजी देशमुख व रामा रोडगे यांनी सांगितले. ज्या ज्या वेळी तो दिसला त्याने अद्यापपर्यंत तरी कोणत्याही मनुष्य प्राण्यावर हल्ला केलेला नाही. केवळ पशूंवर हल्ला केला आहे. त्यामुळे हल्ला करण्याची वाट कशाला पाहायची, त्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने पिंजरा लावावा, अशी मागणी बिटरगावचे महेंद्र पाटील यांनी केली.