जगन्नाथ हुक्केरी
सोलापूर : एम. ए., एम.एड., टीईटी (शिक्षक पात्रता परीक्षा), सीटीटीसी (कॉम्प्युटर टिचर ट्रेनिंग कोर्स) इतक्या पदव्या असतानाही केवळ पैसे नसल्यामुळे शिक्षकी नोकरी मिळत नसल्याने गणेश बाबुराव माने यांनी २०१२ पासून दर रविवारी खंदक बागेत बिनभिंतीच्या निसर्गरम्य शाळेत स्पर्धा परीक्षेचे धडे देऊ लागले. बिन पैसे असलेल्या या बिनभिंतीच्या शाळेतून आजपर्यंत रेल्वे विभागात ३४ तर न्यायालयात ६ असे ४० जण नोकरीस लागले आहेत.
कैकाडी गल्लीत राहणारे गणेश माने यांचे वडील बाबुराव हे रिक्षाचालक आहेत. शिक्षकी नोकरीसाठी मुलाखतीची पत्रे येतात; मात्र पैसे नसल्यामुळे आजपर्यंत केवळ मुलाखत देऊनच यावे लागते. मला एकट्याला नोकरी लागली नाही म्हणून काय झालं, इतरांना तरी आपण शासकीय सेवेत पाठवू हा निर्धार करून त्यांनी गेल्या ८-९ वर्षांपासून खंदक बागेत स्पर्धा परीक्षेचे मोफत वर्ग सुरू केले.
दशभूजा गणपती प्रतिष्ठानचे संस्थापक देविदास बनसोडे, सुरेश भगत आणि साईनाथ सामाजिक संस्थेचे संस्थापक प्रमोद अनिल कारंडे यांनी बिनभिंतीच्या शाळेतील मुलांना स्पर्धा परीक्षेची पुस्तके उपलब्ध करून दिली. रविवारशिवाय ज्या-ज्या दिवशी शासकीय सुटी असेल त्या दिवशीही न चुकता बिनभिंतीची शाळा भरविली जाते. रेल्वेत जाणाºया इच्छुक विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय आहे.
रेल्वेसह तलाठी, जिल्हा परिषद, पोलीस भरतीत जाणारेही या बिनभिंतीच्या शाळेत बिनपैशाने स्पर्धा परीक्षेचे धडे गिरवत असतात. दोन-तीनवेळा सराव परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांमधील एक प्रकारची भीतीही दूर केली जाते. प्रा. गणेश माने यांच्या या अनोख्या कार्याची दखल घेऊन क्रांतीवीर लहूजी वस्ताद तरुण मंडळाने त्यांना अण्णाभाऊ साठे सामाजिक पुरस्कार देऊन गौरव केला आहे. दशभूजा गणपती प्रतिष्ठान आणि श्रीमंतयोगी प्रतिष्ठानने त्यांना पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे.
दोन विषयांसाठी मंदिरात वर्गनवीन पॅटर्ननुसार आता गणित आणि बुद्धिमता हे दोन विषय शिकवण्यासाठी फळा अन् खडू लागत असल्याने उच्चशिक्षित प्रमोद कारंडे यांनी सळई मारुती मंदिर उपलब्ध करून दिले. इतर विषय खंदक बागेत तर दोन विषय मंदिरात घेतले जातात, असे प्रा. गणेश माने म्हणाले.