माढा तालुक्यातील मोडनिंब येथे पाच कलाकेंद्रे आहेत. यामध्ये नटरंग, राधिका, स्वरांजली, पद्मावती, धनलक्ष्मी, यांचा समावेश असून, या कला केंद्रांमध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पुणे, जळगाव, इस्लामपूर, लातूर, अहमदनगर, सांगली, वाई, नांदेड, बीड जिल्ह्यासह अन्य जिल्ह्यांतून कलावंत मोडनिंबच्या कला केंद्रांमध्ये आपली कला सादर करण्यासाठी येतात. वर्षापैकी अकरा महिने कला केंद्रामध्ये राहून आपली कला सादर करून येणाऱ्या रसिक जणांची करमणूक करतात.
कोरोनाचा कहर कमी झाल्यामुळे महाराष्ट्रातील सर्व कला केंद्रे पुन्हा सुरू झाली. प्रत्येक कलावंत नव्या उमेदीने आपली कला सादर करू लागला; परंतु त्यांचा जम बसतो न बसतो तोच कोरोनाचा उद्रेक वाढू लागला आहे. मागील वर्षी कोरोनामुळे सर्व कलावंत भीतीमुळे आपापल्या गावी निघून गेले होते. मात्र, यंदाच्या वर्षी कसल्याही परिस्थितीत घरी न जाता आपली कला शासनाचे सर्व नियम व कोरोनापासून बचाव होण्यासाठी स्वतःचे संरक्षण करताना दिसत आहेत.
सध्या शासनाने ४५ वर्षांवरील नागरिकांना मोफत लस देणे सुरू केले आहे. या कला केंद्रांमध्येही सर्व मंडळी याचा लाभ घेत आहेत. मात्र, ज्या नृत्यांगनांचे वय अठरा वर्षांच्या पुढील आहे, अशा सर्व नृत्यांगना, ढोलकीवादक, पेटीवादक, तबलावादक यांनाही लस मिळावी, अशी मागणी वैशाली नगरकर, माधवी नगरकर, ज्योती दिंद्रूडकर, दीपाली इस्लामपूरकर, सोनम परभणीकर या सर्व कलावंतांकडून होत आहे.
यावेळी नटरंग व राधिका कलाकेंद्राचे संचालक किसनराव जाधव, पद्मावती कला केंद्राचे संचालक अभय कुमार तेरदाळे, धनलक्ष्मी कला केंद्राचे संचालक पीतांबर सुर्वे व केशरबाई घाडगे स्वरांजली कलाकेंद्राचे जगन्नाथ घाडगे यांनी लॉकडाऊन करण्यापेक्षा प्रत्येक कलावंताला लसीकरण केले, तर त्यापासून त्यांचा बचाव होईल, अशी मागणी केली आहे.
---
मिळेल ते काम करून भागवली भूक
गेल्या वर्षीपासून कोरोना महामारीमुळे अनेकांचे हाल झाले. यामध्ये या कलाकारांनाही परिस्थतीचा सामना करावा लागला. यातील सर्व लावणी नृत्यांगनांना अन्य कोणतेच काम येत असल्यामुळे तब्बल सात महिने त्या घरातच बसून होत्या. तेवढ्यावरच आपला उदरनिर्वाह करावा लागला, तर या लावणी कलावंतांना साथसंगत देणारे ढोलकीवादक, तबलावादक, पेटीवादक व सोंगाड्यांही मिळेल ते काम करून आपला व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करावा लागला.
---
गतवर्षी लॉकडाऊन झाल्यानंतर सर्व थिएटरमधील कलावंत आपापल्या गावी निघून गेले. मी मोडनिंबचा असल्यामुळे माझा व कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, असा प्रश्न पडला होता. मात्र, त्यावेळी मी उजनी धरण, भीमानगर येथून मासे आणून त्यांची विक्री केली आणि यावर कुटुंबातील सहा माणसांचा उदरनिर्वाह केला.
-सिद्धेश्वर आखाडे, सोंगाड्या कलावंत