सोलापूर : शरद पवारांनी माढ्यातून माघार घेतल्यानंतर खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांना सांगितले की, ‘मी उभारणार नाही. तुमच्यासाठी माढा सोडतोय.’ तेव्हा विजयदादा म्हणाले, ‘मला नको, रणजितदादांना उमेदवारी द्या.’ त्यानंतर रामराजे, बबनदादा, रश्मीदीदी अन् जयकुमार यांनी नव्या नावाला कडाडून विरोध केल्यामुळे उमेदवारीची घोषणा लटकली. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर रणजितदादांनी थेट मुंबई गाठली अन् जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली.
दरम्यान, मोहिते-पाटील घराण्यातील उमेदवारीचा निर्णय न होणे अन् प्रभाकर देशमुख यांचे नाव पुन्हा चर्चेत येणे अन् त्याचवेळी रणजितसिंह मोहिते-पाटलांनी भाजपामंत्री गिरीश महाजन यांची त्यांच्या बंगल्यावर खासगी भेट घेणे, यातून अवघ्या महाराष्ट्राला मंगळवारी नवी ब्रेकिंग न्यूज मिळाली; मात्र ‘सोमवारी पुण्यात राष्ट्रवादीच्या कार्यालयातूनच मी जलसंपदा मंत्री महाजन यांना मोबाईल कॉल केला होता. आमच्या शंकर साखर कारखान्याच्या पाणीपट्टीसंदर्भात मी त्यांना मंगळवारी भेटायला येणार असे सांगितले होते. विशेष म्हणजे मोबाईलवर बोलत असताना माझ्यासमोर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दीपकआबा साळुंखे यांच्यासह इतरही नेते होते,’ अशी माहिती रणजितदादांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
सदाशिवनगर येथील शंकर सहकारी साखर कारखान्याने आसवानी प्रकल्प सुरू केला आहे. या कारखान्याकडे मोठी पाणीपट्टी थकीत आहे. तीन महिन्यांपूर्वी या कारखान्याचे चेअरमन म्हणून रणजितसिंह मोहिते-पाटील यांची निवड झाली आहे. या थकीत पाणीपट्टीचा प्रश्न निकाली काढण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे रणजितदादा सांगत आहेत. पवारांच्या माघारीनंतर माढ्यातील उमेदवारीबाबत चर्चा सुरू आहे. पुण्यात सोमवारी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीनंतर खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांचे नाव चर्चेत आले होते. पण सायंकाळी पुन्हा प्रभाकर देशमुख यांचे नाव चर्चेत आले.
२००९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीतही राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदे यांच्यासह जिल्ह्यातील काही नेत्यांनी रणजिदादांच्या उमेदवारीला विरोध केला होता.
या वादातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची माढा लोकसभा मतदारसंघात एंट्री झाली होती.
ऐन निवडणुकीच्या तोंडावरच दादांना भाजपाचे महाजन का आठवले ?- विरोधी पक्षातील एखादा नेता जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना भेटला तर तो भाजपच्या वाटेवर असल्याचे अधिकृत संकेत स्पष्टपणे मिळतात. नगरचे सुजय विखे-पाटील यांच्या भाजपा प्रवेशाची चर्चा महाजन यांच्यासोबतच झाली होती. विशेष म्हणजे मंगळवारी सकाळी महाजनांच्या बंगल्यावर सुजय यांच्या भाजपा प्रवेशाची तयारी सुरू असताना त्याचवेळी रणजितदादा या ठिकाणी येणे, योगायोगाचे नव्हते, असे कार्यकर्ते सोशल मीडियावर ठामपणे सांगत होते. कारखान्याचा विषय अनेक दिवसांपासूनचा असला तरी ऐन निवडणुकीच्या तोंडावरच रणजितदादांना भाजपाचे महाजन का आठवले ?, असाही प्रश्न या कार्यकर्त्यांना पडला.