आज समाजात शहाणपण शिकवणाºयांचा दुष्काळ नाही तर शहाणपणाने वागणाºयांचा दुष्काळ आहे. शहाणपणा करणारे अर्धवट हळकुंडाने पिवळे झालेले असतात. कोणतीही नवीन गोष्ट आम्हाला माहिती झाली की, आम्ही ती लगेच लोकांना सांगून मोकळे होतो. लोकांनी कसे वागावे, हे आपण अचूक सांगतो; पण तोच शहाणपणा आपल्यावर, वेळ आल्यानंतर आपण करतो का? हाच खरा प्रश्न आहे. सारं जग आम्हाला कळलं, असं उगीच वाटत राहतं. तसं आपण, मला सगळं माहिती आहे, असं बºयाचदा बोलतोही. खरं आहे ज्ञान मुकं असतं तर अज्ञान खूप बोलकं असतं. मला काही कळत नाही, हे एकदा कळलं की, काहीतरी कळायला सुरुवात होते, असं म्हणतात. हे समजून घ्यायचं आज गरज आहे.
अज्ञ माणसं तज्ज्ञापणानं शिकवू लागल्यामुळं सुज्ञपणात काही परिवर्तन होताना दिसत नाही. शिक्षणक्षेत्रात हे नेहमी घडतं. शाळेतील पोरांपुढे उभं न राहणारी अनेक तज्ज्ञ मंडळी अभ्यासक्रम व शाळांच्या गुणवत्ता वाढीसाठीचे प्रशिक्षण देताना दिसतात. शेतीच्या वास्तवाचे ज्ञान अनुभव नसणारी माणसं पीकपाण्याच्या नियोजनाचा सल्ला देताना दिसतात. खोटं बोलण्याचं अलिखित अभिवचन देत सर्वच पक्ष आपले जाहिरनामे केवळ छापतात. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करतानाही लोका सांगे ब्रह्मज्ञाऩ़़ अशीच गत होते त्यांची. उक्ती आणि कृतीत आज प्रत्येकात फार मोठा फरक दिसतो. व्यायाम, योगा,योगासने, आरोग्य, मन:शांती, चालणे, फिरणे आदींबाबत तर कोण ? काय ? सांगेल याचा नेम नाही; पण सांंगणाºयांनी खरंच आपण तसं वागतो, करतो का? याचा स्वत:शी प्रामाणिक राहून, पडताळून पाहिलं तर लेख शीर्षक रास्तच वाटेल.
लोकांना शहाणपणा यावा, असं खरंच वाटंत असेल तर स्वत: तसं वागावंच लागेल. मग तुम्ही काही न सांगताही लोक सुधारतील, कारण विचाराला कर्तृत्वाची जोड असल्याशिवाय शब्दाला वजन, उंची येत नाही. लोकांना काही सांगण्याची घाई करु नये. ऊठसूट सल्ले देऊ नयेत़ विचारल्याविना कोणा काही सांगू नये. सांगण्यापूर्वी त्यांच्या साºया परिस्थितीचा सारासार विचार करून माझ्यावर ती वेळ आली तर मी त्यावेळी काय करु शकतो, याचा विचार करावा. आपलं आचरण शुद्ध असलंच पाहिजे, विचार सुंदर असायला हवेत, जगणं निर्मळ असायलाच हवं, तरच लोकांना काही बोध करावा, अन्यथा संयम राखावा.
जाणत्यांनी जरुर मार्गदर्शन करायलाच हवं, कारण तो त्यांचा अधिकार असतो. पण जाणती माणसं या स्वयंसिद्ध ब्रह्मज्ञानी लोकांच्या गर्दीपासून कायम दूर राहतात. यामुळे ज्ञानापेक्षा संभ्रम जास्त निर्माण होतो. त्यामुळे दिशाहीन समाज निर्माण होण्याची शक्यता अधिक असते. आजही समाजामध्ये अनेक गोष्टी आम्हाला अट्टाहासाने कराव्या लागतील. अशांतता, अस्वस्थता मिटविण्यासाठी आचरणहीन शब्दांचे बुडबुडे हवेत सोडून देणं बंद करावं लागेल. माणसाने माणसाशी माणसासारखे वागणं शिकल्याशिवाय आम्ही स्वस्थ व शांत जीवन जगूच शकत नाही. आजही आम्ही बुवाबाजी, जादूटोण्यावर श्रद्धा ठेवत राहतो. अगदी नरबळीपर्यंत आमची मजल जात आहे. याचं समूळ उच्चाटन व्हायला हवं. ते जाणिवपूर्वक घडायला हवं.. उघड्यावरचे, बाहेरचे पदार्थ खाऊ नयेत हे माहीत असतानाही आम्ही खात राहतो.
मुलांनी जसं वागायला हवं वाटतं तसं अगोदर आपणास वागावं लागेल. कारण मुलं आपल्या शब्दापेक्षा कृतीतून अधिक शिकत असतात. म्हणून केवळ तोंडी ब्रह्मज्ञानाचे डोस पाजण्यापेक्षा कडव्या तत्त्वज्ञानाचे आचरण आपण स्वत: करावे, त्याशिवाय मुलांमध्ये अपेक्षित बदल घडताना दिसून येणार नाहीत. वैयक्तिक, सामाजिक, सर्वच पातळीवर माणुसकी हीच जात व मानवता हाच खरा. या न्यायानं वागलं तर काहीतरी सात्विक वर्तनाबद्दल घडू शकेल.
प्रत्येकाने आपला परीघ सुंदर करावा. जीवन कसं असावं याचा वस्तुपाठ बनवावा. तरच आपण चार लोकांना दोन गोष्टी सांगण्याचा नैतिक अधिकार प्राप्त करु शकू, अन्यथा सारं पालथ्या घागरीवर पाणी. तेव्हा लोकांना ब्रह्मज्ञान शिकविणे, सांगण्यापूर्वी विचार करा. नाही तर लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण मात्र कोरडा पाषाण, अशी गत आपली होईल.तेव्हा विचार करु या..- रवींद्र देशमुख, (लेखक शिक्षक आहेत)