सोलापूर : महापालिकेच्या प्रभाग नऊमधील सिव्हिल चौक, कुचन नगर आणि प्रभाग क्र. चारमधील सम्राट चौक, हनुमान नगर या भागातील कचरा कोंडाळी हटविण्यात आली आहेत. प्रभागात आता स्वच्छता अभियानासाठी बोर्डही लावण्यात आले आहेत. तरीही काही लोक रस्त्यावर टाकत आहेत. हा कचरा हटविण्यासाठी कार्यकर्त्यांसमवेत स्वच्छता अभियान राबविण्याचा निर्धार महिला व बालकल्याण समितीच्या सभापती रामेश्वरी बिर्रु आणि नगरसेविका वंदना गायकवाड यांनी जाहीर केला आहे.
रामेश्वरी बिर्रु म्हणाल्या, आम्ही आमच्या प्रभागातील सिव्हिल चौक, फलमारी झोपडपट्टी, विनोबा झोपडपट्टी, कुचन नगर, कर्णिक नगर, पद्मानगर, दाजी पेठ, रविवार पेठ या भागात स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासाठी डिजिटल फलक लावले आहेत. पूर्वी या ठिकाणी असलेली कचरा कोंडाळी आता हटविण्यात आली आहेत. नागरिकांना डस्टबीनचे वाटपही करण्यात आले आहे. पुंजाल मैदानासह इतर भागात अजूनही कचरा दिसतोय. आमच्या प्रभागातील स्मार्ट महिलांनी या कचराफेकूंची माहिती द्यावी, असे सांगण्यात आले आहे.
जी मंडळी स्वच्छतेबाबत चांगले काम करतील त्यांचा गौरव करण्यात येईल. पण जे लोक जाणूनबुजून रस्त्यावर कचरा टाकतील त्यांना दंड झाला पाहिजे. आरोग्य निरीक्षकांना माहिती कळवून त्यांना धडा शिकविण्यात येईल. स्वच्छता अभियान राबविण्यात येईल. नगरसेविका वंदना गायकवाड म्हणाल्या, आमच्या प्रभागातील सम्राट चौक, बाळीवेस, जम्मा वस्ती, शारदा हॉस्पिटल परिसर यांसह इतर परिसरात पूर्वीच कचरा कोंडाळी भरलेली असायची. महापालिकेने कचरा कोंडाळी हटविण्याची कार्यवाही करण्यापूर्वी आम्ही काही कोंडाळी हटविण्यास सांगितली होती. स्मार्ट सिटी योजनेतून डस्टबीन वाटप सुरू झाल्यानंतर आम्ही घरोघरी जाऊन लोकांना घंटागाडीत कचरा टाकावा, असे आवाहन करीत होतो.
‘लोकमत’च्या स्मार्ट सखींसोबत करणार काम- लोकमत’च्या स्मार्ट सखींसोबत आम्हीही आता काम करणार आहोत. अजूनही काही भागात रस्त्यावर कचरा दिसतोय. तो हटविण्यासाठी कार्यकर्त्यांना सोबत घेऊन स्वच्छता मोहीम राबविणार आहोत. काही दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करावी लागेल. त्यांची माहितीही महापालिकेच्या आरोग्य निरीक्षकांना देणार आहोत.