सोलापूर : माढा तालुक्यातील उपळाई बुद्रुक येथे गुरुवारी महावितरणच्या कर्मचाऱ्यांवर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी प्रमुख आरोपी सरपंच मनोज अप्पाराव गायकवाड याच्यासह 8 आरोपींना पोलिसांनी शुक्रवारी (दि. 16) बेड्या ठोकल्या आहेत. या सर्व आरोपींना सोमवार, दि. 19 पर्यत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. उपळाई बुद्रुक येथील सरपंच मनोज अप्पाराव गायकवाड व त्याच्या इतर साथीदारांनी दि.15 रोजी महावितरणचे प्रभारी उपकार्यकारी अभियंता रमेश चव्हाण, सहायक अभियंता प्रेमनाथ चव्हाण, तंत्रज्ञ शिवाजी यमलवाड, अक्षय सलगर, राजकुमार हजारे, उपयंत्रचालक अतुल हरणे,बाह्यस्रोत कर्मचारी भास्कर सुतार यांना अमानुषपणे बेदम मारहाण केली. या मारहाणीत महावितरणचे सातही अभियंते व कर्मचारी जबर जखमी झाले. याप्रकरणी पोलिसांनी उपळाईचा सरपंच मनोज अप्पाराव गायकवाड व त्याचे साथीदार लक्ष्मण चांगदेव जाधव, बाळू विठ्ठल माळी, सिद्धेश्वर अप्पाराव शेलार, शंकर शिवाजी गोरे, पप्पू महादेव डुचाळ, ज्ञानदेव चांगदेव राऊत, बाळू तुकाराम डुचाळ व सुनील क्षीरसागर यांचा मुलगा अशा एकूण 9 आरोपींविरुद्ध भा.दं.वि.च्या कलम 353, 332, 143, 147, 149, 504 व 506 अन्वये गुन्हा दाखल केला. उपळाई बुद्रुक येथील मारहाण प्रकरणाची महावितरण व्यवस्थापनाने गंभीर दखल घेत सर्व आरोपींना ताबडतोब अटक करून कठोर कारवाईची मागणी पोलिस प्रशासनाकडे केली. आरोपींच्या अटकेसाठी महावितरणचे वरिष्ठ अधिकारी माढा पोलिस ठाण्यात गुरुवारी ठाण मांडून होते. यासोबतच जिल्हा पोलिस अधीक्षक एस. वीरेश प्रभू यांनीही आरोपींविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश दिले. पोलिस यंत्रणेने या सर्व आरोपींना अटक करण्यासाठी गुरुवारी शोध मोहीम सुरु केली. यात शुक्रवारी (दि. 16) सकाळच्या सुमारास प्रमुख आरोपी व उपळाईचा सरपंच मनोज अप्पाराव गायकवाड याच्यासह लक्ष्मण चांगदेव जाधव, बाळू विठ्ठल माळी, सिद्धेश्वर अप्पाराव शेलार, शंकर शिवाजी गोरे, पप्पू महादेव डुचाळ, ज्ञानदेव चांगदेव राऊत, बाळू तुकाराम डुचाळ या आरोपींना माढा ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अतुल भोस यांच्या पथकाने बेड्या ठोकल्या व गजाआड केले.
महावितरणच्या कर्मचाऱ्यांवर जीवघेणा हल्ला, सरपंच गायकवाडची तुरुंगात रवानगी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2018 7:59 PM