सोलापूर : जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मागणीनुसार हमीभावाने मका खरेदी करणारी केंद्रे सुरू करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. शासनाचे पोर्टल उघडताच ही केंद्रे सोमवारपासून सुरू होतील. जिल्ह्यात ३८ हजार क्विंटल मका खरेदी करण्यात येणार आहे.
यापूर्वी शासनाने जिल्ह्यात मका खरेदी केंद्रे सुरू केली होती. शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचण्याच्या आधीच सरकारने खरेदी बंद केल्याची माहिती अगत्याने पोहोचवली. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मक्याची विक्री करता आली नाही. राज्याने निश्चित केलेले मका खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याने खरेदी थांबविण्यात आल्याचे सांगण्यात आले. परंतु, खरेदी केंद्रांच्या अडचणी आणि शेतकऱ्यांच्या अडचणी याकडे दुर्लक्ष केल्याने मका उत्पादक शेतकरी संतप्त झाले होते. पुन्हा मका खरेदी केंद्र सुरू करण्याची शेतकऱ्यांची मागणी होती.
पणन विभागाने आज दुपारी मका खरेदी केंद्र सुरू करण्यास मान्यता दिल्याचे पत्र जिल्हा पणन अधिकाऱ्यांना पाठवले. सोलापूर जिल्ह्यात ३८ हजार क्विंटल मका खरेदी करण्यास मान्यता मिळाली आहे. ३१ जानेवारीपर्यंत खरेदीची मुदत असणार आहे. त्यापूर्वी इष्टांकपूर्ती झाल्यास केंद्रे गुंडाळली जातील असे सांगण्यात आले. तालुकानिहाय उद्दिष्ट देण्यात आले नाही; मात्र सोमवारी पोर्टल सुरू होताच खरेदी सुरू होईल अशी माहिती जिल्हा पणन अधिकारी बी. बी. वाडीकर यांनी दिली.
--------
मागणी सव्वा लाखाची, मान्यता ३८ हजारांची
जिल्ह्यात सव्वा लाख क्विंटलपेक्षा अधिक मका शेतकऱ्याकडे शिल्लक आहेत. आतापर्यंत शेतकऱ्यांनी केलेल्या नोंदीनुसार एक लाख १७ हजार क्विंटल मका विक्री विना शिल्लक राहिली आहे. शासनाने मात्र अवघ्या ३८ हजार क्विंटल खरेदी करण्याचा निर्णय घेतल्याने हा प्रश्न पुन्हा उद्भवण्याची शक्यता आहे. यापूर्वी २५,२६८ क्विंटल खरेदीचे उद्दिष्ट देण्यात आले होते.
-------
क्विंटलमागे ४०० रुपयांचा फायदा
मक्याचा बाजारभाव सध्या १३०० रुपये प्रतिक्विंटल आहे. शासनाकडून हमीभावाने खरेदी केल्यास शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ४०० रुपये अधिक मिळणार आहेत. त्यामुळे असंख्य शेतकरी हमीभाव सुरू करण्यासाठी मागणी करीत होते.