सोलापूर : राजस्थान येथे कृत्रिमरीत्या अंडी उबवून माळढोकच्या पिल्लांना जन्माला घालण्यात येत आहे. त्यांच्याकडून दोन मादी व एक नर सोलापुरातील नान्नज अभयारण्य येथे आणण्यात येणार आहे. यासाठीचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना अतिरिक्त उपमुख्य वनसंरक्षक क्लेमेंट बेल यांनी उपवनसंरक्षक वन्यजीव विभागाला दिले आहेत.
उत्तर सोलापुरातील नान्नज अभयारण्याची पाहणी करण्यासाठी क्लेमेंट बेल हे सोलापुरात आले होते. पाहणी केल्यानंतर अभयारण्याचे अधिकारी, मानद वन्यजीव रक्षक यांच्यासोबत त्यांनी बैठक घेतली. या बैठकीत चर्चा झाल्यानंतर त्यांनी राजस्थानातून माळढोक आणण्याचा प्रयत्न आहे. यासाठी पुण्यातील उपवनसंरक्षक वन्यजीव विभागाला सूचना देणार असल्याचे त्यांनी या बैठकीत सांगितले.
आधी अधिवास वाचविण्याची गरज
राजस्थानातील प्रकल्पात आधी १०० पेक्षा जास्त पिल्ले असायला हवी. त्यानंतर इतरत्र ही पिल्ले देता येतील. राजस्थान सरकारकडून माळढोकची पिल्ले सोलापुरात आणणे ही मोठी प्रक्रिया आहे. यासाठी अनेक वर्षांचा कालावधी लागू शकतो. त्यापूर्वी सोलापुरातील माळढोकचा अधिवास वाचविणे गरजेचे आहे. गुजरात सरकारने त्यांच्याकडील माळढोक मध्य प्रदेश सरकारला दिला नाही. तर राजस्थान सरकार आपल्याला माळढोक देईल का, असा प्रश्न मानद वन्यजीव रक्षक भरत छेडा यांनी उपस्थित केला आहे.
राजस्थानात कृत्रिमरीत्या माळढोकची अंडी उबविण्यात येतात. तेथून सोलारपुरात दोन मादी, एक नर आणणार आहोत. त्यासाठी बऱ्याच परवानग्यांची गरज असून ती एक मोठी प्रक्रिया आहे. या प्रक्रियेची सुरुवात झाली आहे. नर, मादी दोघे नान्नजच्या अधिवासात राहावेत व त्यांची पिल्लेही जन्मावी यासाठी आमचा प्रयत्न आहे.
- दिलीप वाघचौरे, सहायक वनसंरक्षक वन्यजीव
वर्षातून एक किंवा दोनच अंडी
माळढोक पक्षी हा वर्षातून एक किंवा दोनच अंडी देतो. या अंड्यातून २३ ते २७ दिवसांनंतर पिल्ले बाहेर पडतात. माळढोकला अधिवासासाठी मोठी जागा मिळत नसल्याने त्यांची संख्या कमी होत आहे. माळढोक हा १५ ते २० वर्षांपर्यंत जगतो. नर हा अंडी व पिल्लांची काळजी घेत नाही. त्यामुळे मादीवरच अधिक जबाबदारी पडते.