मनोहरमामाचे शिष्य विशाल वाघमारे व ओंकार शिंदे अद्याप फरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:28 AM2021-09-16T04:28:48+5:302021-09-16T04:28:48+5:30
मनोहरमामा भोसले याचे शिष्य व सेवेकरी म्हणून मामाबरोबर सावलीसारखे वावरणारे विशाल वाघमारे ऊर्फ नाथबाबा व ओंकार शिंदे या दोघांविरोधातही ...
मनोहरमामा भोसले याचे शिष्य व सेवेकरी म्हणून मामाबरोबर सावलीसारखे वावरणारे विशाल वाघमारे ऊर्फ नाथबाबा व ओंकार शिंदे या दोघांविरोधातही बारामती व करमाळा पोलीस ठाण्यात फसवणूक व अत्याचाराचे गुन्हे दाखल झाले आहेत. मनोहरमामा भोसलेला अटक झाली, पण हे दोन शिष्य अद्याप फरार आहेत.
बारामती येथील साठेनगर कसबामधील शशिकांत खरात यांच्या वडिलांचा थायरॉईड कॅन्सर बरा करतो म्हणून मनोहरमामा भोसलेसह विशाल वाघमारे ऊर्फ नाथबाबा व ओंकार शिंदे यांनी २ लाख ५१ हजार ५०० रुपयांची फसवणूक केल्याचा व सातारा येथील पीडित महिलेवर मार्च २०२० मध्ये त्या महिलेचे घरगुती प्रॉब्लेम दूर करण्याचे आमिष दाखवून तिच्यावर मनोहरमामा भोसलेसह विशाल वाघमारे ऊर्फ नाथबाबा व ओंकार शिंदे या तिघांवर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे.
बारामती येथील फसवणुकीच्या गुन्ह्यात मनोहरमामा भोसले १६ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत आहे. दरम्यान, बारामती व करमाळा येथे दाखल झालेल्या दोन्ही गुन्ह्यात विशाल वाघमारे ऊर्फ नाथबाबा व ओंकार शिंदे पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. बारामती व करमाळाचे पोलीस या दोघांचा शोध घेत आहेत.
................
कोण आहेत हे दोन शिष्य...
विशाल वाघमारे ऊर्फ नाथबाबा हा मूळचा मोहोळ (जि. सोलापूर) येथील रहिवासी असून, तो आपल्या बहिणीकडे अंथुर्णे ता. इंदापूर जि. पुणे येथे गॅस एजन्सीमध्ये स्वयंपाकाचा गॅस वाहतुकीचे काम करीत होता. तेथे असताना सावंतवाडी गोजूबावी (बारामती) येथील मठात त्याची आठ वर्षापूर्वी मामा महाराजांची भेट झाली. ओंकार शिंदे हा बारामती येथील असून, त्याचा हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स झालेला आहे. तो मनोहरमामाकडे भक्त म्हणून आला व सेवेकरी बनला. दोघेही मनोहरमामाच्या वयाचे आहेत. विशाल वाघमारे ऊर्फ नाथबाबा व ओंकार शिंदे दोघेही उंदरगाव येथे आश्रमात आलेल्या भक्तांना मामाशी भेट घालून देत.
फोटो : विशाल वाघमारे ऊर्फ नाथबाबा जिल्हा सोलवर पाठविला आहे.