याबाबत निकिता ऊर्फ सोनाली दत्तात्रय शिनगारे (रा. शेळवे, ता. पंढरपूर) यांचा मावसभाऊ उदय संजय पवार (रा. गोपाळपूर, ता. पंढरपूर) यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस सूत्राकडील माहितीनुसार, शेळवे येथील निकिता ऊर्फ सोनाली दत्तात्रय शिनगारे हिचा सासरी छळ सुरू होता. यामुळे उदय संजय पवार, विलास चव्हाण, तात्या नागटिळक, संतोष चव्हाण यांनी तीन वेळा निकिताच्या घरी जाऊन सासरच्या लाेकांना समजावून सांगितले. त्यानंतरही ते निकिताला त्रास देत होते. निकिताचा दीर नितीन शिनगारे हा निकिता घरी एकटी असताना विकृत नजरेने पाहात असायचा. तो जीवे मारण्याची धमकी द्यायचा. याबाबतसुद्धा शिनगारे परिवाराला समजावून सांगितले. ३१ मार्च रोजी उदय पवार यांना सदाशिव गाजरे यांनी फोन करून तुमची मावस बहीण निकिता हिने शेतातील लिंबाच्या झाडास गळफास घेतल्याचा निरोप दिला.
त्यानंतर निकिता (वय २६) हिला दोरीने गळफास देऊन ठार मारले असल्याबाबतची उदय संजय पवार यांनी १ एप्रिल रोजी फिर्याद दिली. या प्रकरणातील तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना शनिवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे करीत आहेत.
---
फिर्यादीचा संशय बळावला
शेळवे (ता. पंढरपूर) येथील घटनास्थळी उदय पवार यांनी जाऊन पाहिले असता निकिता ही लिंबाच्या झाडाखाली पडलेली दिसली. त्यावेळी तिच्या गळ्याला दोरी होती. दोरी तुटलेल्या लिंबाच्या झाडाच्या फांदीला बांधलेली होती. निकिताला दीर नितीन शिनगारे, सासरा दिलीप शिनगारे, अतुल हरी गाजरे (सर्व रा. शेळवे), सखाराम ज्ञानेश्वर गाजरे, नणंद सविता सखाराम गाजरे (दोघे रा. इसबावी) यांनी तिचा गळा दोरीने आवळून जीवे ठार मारल्याचा संशय बळावल्याने फिर्यादीने तक्रार दिली.