सोलापुरातील बाजारपेठा हाऊसफुल्ल; 'सोशल डिस्टन्स'चा उडाला फज्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2020 02:26 PM2020-04-24T14:26:54+5:302020-04-24T14:30:03+5:30
किराणा दुकानांसमोर रांगाच रांगा; भाजीमंडईतही गर्दी, गर्दी वाढल्याने पोलिसांनी केली दुकाने बंद...!!
सोलापूर : सोलापूर शहरात कोरोना चे रुग्ण वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने शहरातील संचारबंदी सोमवारपर्यंत वाढवली आहे. दरम्यान, खरेदीसाठी सोलापूरकरांना शुक्रवारी सकाळी 8 ते 2 वाजेपर्यंत सवलत दिली होती. मात्र या सवलतीचा फायदा घेत सोलापूरकरांनी शहरातील सर्वच बाजारपेठ परिसरात खरेदीसाठी गर्दी केली. याचवेळी प्रशासनाने सांगितलेले सर्व नियम धाब्यावर बसवून शहरवासीयांनी खरेदीसाठी गर्दी केली.
दरम्यान, गुरुवारी एकाच दिवशी कोरोनाचे सहा पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून शुक्रवारी दुपारी १२ पासून सोमवारी मध्यरात्री १२ पर्यंत असे चार दिवस सलग शहर कडकडीत बंद ठेवण्याचे आदेश जारी केले. पुढील तीन दिवस काहीच मिळणार नसल्याने शुक्रवारी सकाळपासूनच सोलापूर शहरातील बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांची तुंबळ गर्दी झाली. दुपारचे १२ वाजत असूनही किराणा दुकानांसमोर लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या. पोलिसांच्या भीतीने अखेर दुकानदारांनी शटर डाऊन केल्याने काहींना रिकाम्या हाताने परतावे लागले.
तीन दिवसांचा बंद लक्षात घेता कित्येकांनी शुक्रवारी सकाळी ७ वाजतापूर्वीपासूनच आपली दुकाने उघडली होती.
सोलापुरातील कुंभार वेस, टिळक चौक, सात रस्ता, आसरा चौक, शिवाजी चौक, चिप्पा मंडई, नेहरू नगर मैदान, होम मैदानावर भाजी खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली होती. जीवनावश्यक साहित्याची खरेदी करताना नागरिकांना कोरोना संसर्ग होण्याची भीती, सोशल डिस्टन्सिंग याचाही विसर पडला. तीन दिवस बंद असल्याने पोलिसांनीही या गर्दीकडे काहिसे दुर्लक्ष केले. परंतु दुपारी १२ वाजताच पोलिसांनी वाहनातून फिरून दुकाने बंद करण्याचे आवाहन केले. १२ नंतर शहरातील रस्त्यांवर पुन्हा सामसूम झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. पुढील तीन दिवस केवळ दवाखाने, मेडिकल सुरू राहणार आहे. दुधाच्या दुकानांना सकाळी व सायंकाळी ६ ते ८ या दोन तासांची सवलत देण्यात आली आहे. शुक्रवारच्या बाजारपेठेतील गर्दीने मात्र सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले.