सोलापूर- सोलापुरातल्या बार्शीतील जवान रामेश्वर काकडे हे बुधवारी छत्तीसगड येथे कर्तव्यवार असताना शहीद झाले. रात्री दीड वाजता त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडले. शहीद रामेश्वर काकडे हे बार्शीतील गौडगाव येथील रहिवासी होते.
शहीद जवान रामेश्वर काकडे हे २०१२ साली सैन्यदलात रुजू झाले होते. त्यानंतर त्यांनी विविध भागात सेवा बजावली. सध्या ते छत्तीसगड राज्यातील रायपूर भागात कार्यरत होते. बुधवारी पहाटे त्यांची प्रकृती खालावलेली होती. त्यानंतर त्यांना उपचारासाठी सैन्य रुग्णालयात ही दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांच्यावतीने देण्यात आली.
गुरुवारी रात्री उशिरा त्यांचे पार्थिव शरीर बार्शीत दाखल झाले. तर रात्री दीड वाजता त्यांचे मूळ गाव गौडगाव येथे शासकीय इतमामत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. वडील वैजिनाथ काकडे यांनी मुखाग्नी दिला.तर यावेळी सीआरपीएफच्या वतीने मानवंदना देखील देण्यात आली. रात्री उशीर झालेला असताना देखील संपूर्ण गाव शहीदाला अखेरचा सलाम देण्यासाठी हजर होते.
शहीद रामेश्वर काकडे यांना अवघ्या दोन महिन्यांचा मुलगा आहे. त्यामुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. शहीद काकडे यांना अखेरचा निरोप देण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार राजेंद्र राऊत, तहसीलदार सुनील शेरखाने हे देखील उपस्थित होते.