दक्षिण सोलापूर : महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवर असलेल्या बरूर गावात थेट उसाच्या फडामध्ये ऑफलाईन मटका खुलेआम सुरू आहे. पैसेही थेट ऑनलाईनद्वारे ट्रान्स्फर केले जात आहेत. पोलीस याबद्दल अनभिज्ञ असले तरी तक्रारीलाही बेदखल केले जात असल्याची ओरड ग्रामस्थांमधून होत आहे.
अनेक वर्षांपासून सीमाभागात मटका व्यवसाय जोरात सुरू आहे. भीमा नदीच्या खोऱ्यात बागायती क्षेत्र वाढले आहे. दरडोई उत्पन्नात वाढ झाली तर रोजंदारी करणाऱ्या शेतमजुरांना मिळणाऱ्या मजुरीतही वाढ झाली. परिणामी नागरिकांच्या हातात पैसा खुळखुळू लागला. सीमाभागात पूर्वीपासून सुरू असलेल्या ऑफलाईन मटका फोफावला आहे.
सुरुवातीच्या काळात कर्नाटकातील मंडळी मटका खेळण्यासाठी टाकळीची हद्द ओलांडून महाराष्ट्रात येत असत. असा एक मोठा वर्ग कर्नाटकातून महाराष्ट्रात केवळ मटका खेळण्यासाठी येत होता. त्यातून उभय राज्यांतील मटकाकिंग यांच्यातील मैत्री घनिष्ठ झाली. महाराष्ट्रातील प्रचलित मटक्याची एजन्सी कर्नाटकात सुरू झाल्याने टाकळीकडे येणारा ओढा काही प्रमाणात कमी झाला होता. मात्र, गेल्या वर्षभरात तो वाढल्याची चर्चा आहे. नातलगांना भेटण्यासाठी आणि अन्य कारण पुढे करत कर्नाटकातील नागरिकांची पावले टाकळीकडे वळताना दिसत आहेत.
-------
पोलिसांपासून चुकविण्यासाठी अशीही क्लुप्ती
सीमाभागातील टाकळी हे मटक्याचे महत्त्वाचे केंद्र मानले जाते. त्यामुळे या गावातील हालचालींकडे पोलिसांचे नेहमीच बारीक लक्ष असते. त्यात कोरोनाच्या बंदोबस्तासाठी पोलिसांची वर्षभर वर्दळ. मटकाबुकींची चांगलीच कोंडी झाल्याने त्यांनी ऑनलाईन मटक्याचे बस्तान उसाच्या फडात बसवले आहे. मोबाईलवर मटक्याचा आकडा चालतो, तर फोन पेवरून रक्कम ट्रान्स्फर केली जाते, अशी माहिती पुढे आली आहे.
------
टाकळी येथील मटक्याचे केंद्र सर्वांना माहीत आहे. दररोज ४० लाखांचा व्यवसाय येथील केंद्रातून होतो. ही बाब मी अनेकदा पोलिसांच्या निदर्शनास आणून दिली आहे. आता त्यावर कारवाई करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे.
- अनमोल केवटे, सामाजिक कार्यकर्ता, मंद्रुप
-----
फोटो : १६ मटका-बरुर
बरुर येथे उसाच्या फडालगत टेबल मांडून मटक्याचे चार्टद्वारे मटका घेताना तरुण.