दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान, काश्मीरचे व्यापारी सोलापुरात; जाणून घ्या काय आहे नेमकं कारण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 12:54 PM2021-03-04T12:54:22+5:302021-03-04T12:54:30+5:30
उत्तर भारतात तोरा : दररोज ४० ट्रक निर्यात; प्रतिकिलो मिळतोय १० रुपये भाव
करमाळा : मधल्या काळात मंदी असताना सोलापुरी केळीच्या दरामध्ये सुधारणा झाली आहे. करमाळा, माढा तालुक्यांसह जिल्ह्यातील निर्यातक्षम केळीचा उत्तर भारतात तोरा वाढला आहे. या भागातून दररोज ४० ट्रक (एका ट्रकमध्ये १० टन) केळी पाठविली जात आहेत. सध्या कॅरेटसाठी ८ ते १० रुपये तर निर्यातक्षम केळीसाठी थेट शिवारतून खरेदीसाठी १३ रुपये भाव मिळू लागला आहे.
सध्या इथली केळी दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान, जम्मू-काश्मीर येथे पाठविली जात आहे. टेंभुर्णी, कंदरं वाशिंबे, उमरड, शेटफळ, चिकलठाण, वांगी भागातून रोज ४० ट्रक (एक ट्रक १०टन क्षमता) केळी उत्तर प्रदेश, दिल्ली, पंजाब, हरियाणा, जम्मू-काश्मिर येथे पाठविली जात आहे. केळीचे दर गेल्या आठवड्यात कॅरेटसाठी ४ ते ५ रुपये किलो असे होते. परंतु आवक कमी झाल्यामुळे व उत्तरेकडून केळीच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने दरात सुधारणा झाली आहे. कॅरेटसाठी प्रति किलो ८ ते १० रुपये व निर्यातक्षम केळीसाठी प्रति किलो १३ रुपये दर शिवार खरेदीत मिळत आहे.
आंध्र प्रदेशातील केळीला पल्प आल्यामुळे नियोजित ठिकाणी माल पोहचविण्याच्या आधीच कंटेनरमध्ये माल पिकत आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी तेथील केळीकडे पाठ फिरवली आहे. तेथील केळीची पाठवणूक उत्तर भारतासह आखाती देशात अधिक होत असते. आंध्र प्रदेशातील दर्जेदार केळी संपल्याने त्याचा लाभ जिल्ह्यातील केळी उत्पादकांना होत आहे. सध्या उजनी परिसरात दर्जेदार केळी उपलब्ध होत आहे.
तीन महिने राहणारा उच्चांकी दर
कोरोना लाॅकडाऊनमुळे रोपांअभावी केळीची लागवडीत संपूर्ण देशभरात घटली आहे. झाल्याने व एप्रिल महिन्यात रमजान रोजे प्रारंभ होत असल्याने आखाती देशातून केळीला प्रचंड प्रमाणात मागणी होते. त्याचा परिणाम म्हणून येत्या मार्च ते मे महिन्यात केळीचा दर उच्चांकी पातळीवर पोहोचण्याची शक्यता आहे.