व्हाॅट्सॲपवर मेसेज फिरला अन् चोरीस गेलेला ट्रॅक्टर व ट्रॉलीचा ठावठिकाणा लागला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:11 AM2021-01-08T05:11:46+5:302021-01-08T05:11:46+5:30
कुर्डूवाडी : रविवारी मध्यरात्री अकुलगाव - कुर्डूवाडी रस्त्यावर चालक प्रातर्विधीसाठी गेल्याची संधी साधून चार चोरट्यांनी दोन ट्रॉलीसह ट्रॅक्टर पळविला ...
कुर्डूवाडी : रविवारी मध्यरात्री अकुलगाव - कुर्डूवाडी रस्त्यावर चालक प्रातर्विधीसाठी गेल्याची संधी साधून चार चोरट्यांनी दोन ट्रॉलीसह ट्रॅक्टर पळविला होता. याबाबत कुर्डूवाडी पोलिसांनी चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करून तपासाची चक्रे वेगाने फिरवली. याबाबत व्हॉट्सॲपवर याची माहिती व्हायरल होताच उस्मानाबाद जिल्ह्यात कुंतलगिरी येथे ट्रॅक्टर ट्रॉली पकडले. मात्र, पोलिसांना पाहताच चोरट्यांनी पलायन केले.
३ जानेवारी रोजी अकुलगाव -कुर्डूवाडी रोडवरून परमेश्वर मत्रे (रा.जामखेड, जि.नगर) हे ऊस वाहतुकीचा ट्रॅक्टर व दोन ट्रॉली घेऊन निघाले होते. दरम्यान प्रातर्विधीसाठी ते रस्त्याच्या कडेला ट्रॅक्टर लावून गेले. हीच संधी साधून चोरट्यांनी ट्रॅक्टर पळविला.
याबाबत कुर्डूवाडी पोलिसांनी चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला होता. सहायक पोलीस निरीक्षक चिमणाजी केंद्रे यांच्या पथकाने तपासाची चक्रे फिरवली. परांडा- भूम रोडवरील सीसीटीव्ही तपासले तेव्हा एका हॉटेलवरील कॅमेऱ्यात ट्रॅक्टर व दोन ट्रॉली भूमच्या दिशेने गेल्याचे दिसले. यादरम्यान पोलीस पथकाने फिर्यादी व मालकाला याबाबतचा भूम, परांडा तसेच इतर ठिकाणच्या व्हॉट्सॲप ग्रुपला ट्रॅक्टर व दोन ट्रॉली चोरी झाल्याचा मेसेज टाकण्यास सांगितले. ट्रॅक्टर व दोन ट्रॉलीबाबत माहिती देणाऱ्यास २० हजारांचे बक्षीसही जाहीर केले. या मेसेजवरून तेथील एका व्यक्तीचा गोपनीय फोन आला. संबधित ट्रॅक्टर व दोन ट्रॉली उस्मानाबाद जिल्ह्यात कुंतलगिरी येथे महामार्गावर मोकळ्या जागेत होते. यावरून पोलीस पथक त्या ठिकाणी पोहोचले. यावेळी पोलिसांची गाडी दिसताच संयशित चोरट्यांनी पळ काढला.
पोलीस अंमलदार सागर गवळी, दत्ता सोमवाड, विशवजित ठोंगे यांच्या पथकाने ही कामगिरी बजावली. पाेलिसांनी २४ तासात लावलेल्या गुन्ह्याच्या तपासाचे कौतुक होत आहे.
---
फोटो- ०५ कुर्डूवाडी
शोधून काढलेल्या ट्रक्टर-ट्रॉली ताब्यात घेतल्यानंतर पोलीस निरीक्षक चिमणाजी केंद्रे, पोलीस अंमलदार सागर गवळी, दत्ता सोमवाड, विश्वजित ठोंगे.