कुर्डूवाडी : चोरीला गेलेल्या ट्रॅक्टर व ट्रॉलीच्या शोधासाठी कुर्डूवाडी पोलिसांनी सोशल मिडियाचा आधार घेतला. व्हाटसअपवर फिरलेल्या मॅसेजमुळे चोरीला गेलेल्या ट्रॉली व ट्रॅक्टरचा तपास लागला. मात्र पोलीस दिसताच आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रविवारी ३ जानेवारी रोजी मध्यरात्री अकुलगाव -कुर्डुवाडी रोडवरून परमेश्वर मत्रे (रा.जामखेड जि.नगर) यांच्या मालकीचा ऊस वाहतुकीचा सुमारे आठ लाख रुपये किंमतीचा ट्रॅक्टर व दोन ट्रॉली चार अज्ञात चोरट्यांनी ट्रॅक्टरचालक प्रातविधीसाठी ट्रॅक्टर रस्त्यावर बाजूला लावून गेल्यानंतर चोरून नेला होता. याबाबत कुर्डूवाडी पोलिसांत अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल होताच सहायक पोलीस निरीक्षक चिमणाजी केंद्रे यांच्या पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवत ट्रॅक्टर व दोन ट्रॉली गेलेल्या दिशेने परांडा भूम रोडवरील सगळे सीसीटीव्ही कॅमेरे चेक केले. त्यावेळी एका हॉटेवरील कॅमेऱ्यात सदरचा ट्रॅक्टर व दोन ट्रॉली भूमच्या दिशेचे गेल्याचे दिसून आले.
यादरम्यान पोलिस पथकाने फिर्यादी व मालकाला याबाबतचा भूम, परांडा तसेच इतर ठिकाणच्या व्हाट्सएप ग्रुपला ट्रॅक्टर व दोन ट्रॉली चोरी झाल्याचा मेसेज पाठवण्यास सांगितला. यावेळी ट्रॅक्टर व दोन ट्रॉलीबाबत माहिती देणाऱ्यास २० हजाराचे रोख बक्षीसही जाहीर करण्यात आले. त्यानुसार त्यांनी सर्व ग्रुपला मेसेज पाठवून दिले. यावरून तेथील एका व्यक्तीचा गोपनीय फोन आला की संबधित ट्रॅक्टर व दोन ट्रॉली कुंतलगिरी (जिल्हा उस्मानाबाद) येथील हायवेवर मोकळ्या जागेत आहे. त्यावरून पोलीस पथक त्या ठिकाणी पोहचले. यावेळी पोलीस गाडी लांबुन दिसताच ते आरोपी मात्र पलायन करून निघून गेले, पण चोरीला गेलला सुमारे आठ लाख रुपयांचा ट्रॅक्टर व दोन ट्रॉली मात्र २४ तासांच्या आत सापडले.
संबधित ट्रॅक्टर व दोन ट्रॉली चोरीला गेल्यानंतर अवघ्या २४ तासाच्या आत सोमवारी कुंतलगिरी ( जिल्हा- उस्मानाबाद) जवळील सोलापूर- औरंगाबाद हायवेच्या बाजूला मोकळ्या जागेत सदरचा ट्रॅक्टर व दोन ट्रॉली शोधण्यात कुर्डूवाडी पोलिसांना यश आले आहे. सहायक पोलीस निरीक्षक चिमणाजी केंद्रे, पोलीस अंमलदार सागर गवळी, दत्ता सोमवाड, विशवजीत ठोंगे यांच्या पथकाला हे यश आले आहे.