दुध दरवाढ आंदोलन ; सोलापूर जिल्ह्यातील दोन लाख लिटरने दूध संकलन घटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 12:22 PM2018-07-18T12:22:20+5:302018-07-18T12:25:59+5:30
दूध संकलनात दोन लाख लिटरने घट झाल्याचा अहवाल निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी विभागीय आयुक्तांना पाठविला आहे.
सोलापूर : शेतकºयांनी सुरु केलेल्या दूध आंदोलनामुळे जिल्ह्यातील दूध संकलनात दोन लाख लिटरने घट झाल्याचा अहवाल निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी विभागीय आयुक्तांना पाठविला आहे.
जिल्ह्यातील दूध आंदोलनावर प्रशासनाचेही लक्ष आहे. जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी यांनी शासनाला सादर केलेल्या माहितीनुसार दहिगाव, ता. माळशिरस येथील शिवप्रसाद फुड्स अँड मिल्क प्रा. कंपनीने सोमवारी आणि मंगळवारी दूध संकलन बंद ठेवले आहे. सोलापूर जिल्हा दूध संघाचा एक टॅँकर मुंबई येथे तर शिवामृत दूध संघाचा एक टॅँकर पुणे येथे पाठविण्यात आला आहे. जिल्ह्यातून उस्मानाबाद दूध संघाचे ३ टॅँकर कामती, मंगळवेढा मार्गे वारणा दूध संघाकरिता तसेच सोलापूर शहरातून राजमंगल दुधाचे तीन पिकअप जीप व १ टेम्पो वळसंग आणि अक्कलकोट उत्तर पोलिसांनी बंदोबस्तात गुलबर्गा येथे पाठविले आहेत. दूध वाहतूक करु इच्छिणाºयांना पोलीस संरक्षण देण्यात आले आहे. १५ जुलैै रोजी जिल्ह्यात २ लाख ८५ हजार लिटर दूध संकलन झाले होते. यात १६ जुलैै रोजी दोन लाख लिटरने घट झाल्याचा अहवाल पाठविण्यात आला आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकºयांच्या खात्यावर प्रतिलिटर पाच रुपये अनुदान जमा करण्याच्या मागणीसाठी सोमवारपासून दूध बंद आंदोलन सुरू केले आहे. सोमवारी सहकारी संघांनी काही प्रमाणात दूध संकलन केले होते. सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघाकडे सोमवारी दोन वेळचे(सकाळ व सायंकाळ) दूध अवघे ११ हजार ८१८ लिटर संकलन झाले होते. मंगळवारी सकाळी त्यात घट होऊन १० हजारांवर आले.
दूध पंढरीच्या जिल्हाभरातील संकलन ‘डॉक’लगतच्या शेतकºयांनी स्वत:हून आणून घातलेले दूध घेत असल्याचे दूध संघाकडून सांगण्यात आले. हे दूध सध्या संकलित करून ठेवले जात असल्याचे सांगण्यात आले.अकलूजच्या शिवामृत सहकारी दूध संघाने सोमवारी ६१ हजार ५०० लिटर दूध संकलित केले होते.
सोलापूर जिल्हा संघाने सोमवारी १८ हजार ८१८ लिटर दूध संकलन व ‘पॅकिंग’ पिशवीद्वारे ५२ हजार ८२६ लिटरची विक्री केली. मंगळवारी मात्र संकलनावर परिणाम झाला असल्याचे सांगण्यात आले. सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघ व शिवामृत सहकारी संघाचे दररोजचे संकलन जवळपास २ लाख १० हजार लिटर होत आहे; मात्र दूध बंदच्या कालावधीत हे संकलन घटले आहे.
चौघांविरुद्ध गुन्हा
जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करून दूध दरवाढ आंदोलन केल्याप्रकरणी पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. हे आंदोलन सोमवारी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या घरासमोर छेडण्यात आले. डॉ. शिवानंद सिद्राम झळके (वय २७, रा. मंद्रुप ता. दक्षिण सोलापूर), चाँद हुसेन कोरबू (वय ४०, रा. बसवनगर, तेरामैल, सोलापूर), राजकुमार काशिनाथ टेळे (वय २६, रा. मंद्रुप, ता. दक्षिण सोलापूर), महंमद शब्बीर शेख (वय २६, रा. मंद्रुप), संतोष बाबुराव साठे (रा. दक्षिण सोलापूर) अशी आरोपींची नावे आहेत.
विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदला असून, तपास पोलीस नाईक दारसिंगे करीत आहेत.
शेतकरीच संपावर
- जनावरांचा सांभाळ करण्यासाठी वैरण, पशुखाद्य व मजुरासाठीचा खर्च वरचेवर वाढत आहे. मागील दोन वर्षांत पशुखाद्याचे दर दीडपट झाले असून वैरणीचेही दर वाढले आहेत. अशी परिस्थिती असताना दुधाचे दर मात्र मागील वर्षभरात सरासरी ८ रुपयाने कमी झाले आहेत. काही ठिकाणी तर गाईच्या दुधाला प्रतिलिटर १५ रुपयांचा भाव दिला जातो. दूध संस्थाचालक विरोधी पक्षाचे असल्याने ते शासनाकडे बोट दाखवून मोकळे होतात. यामध्ये भरडणारा शेतकरी दूध बंद आंदोलनात सक्रिय झाला आहे
आंदोलनाचा सर्वांनीच घेतला धसका
४दूध बंद आंदोलनाचा धसका सर्वांनीच घेतला असून, मंगळवारी एकही टँकर दूध वाहतुकीसाठी बाहेर पडला नाही. जिल्ह्याच्या कोणत्याही भागात दुधाचे कॅन वाहतूक करण्याचे धाडस कोणी करताना दिसत नसल्याचे सांगण्यात आले.
दोन दिवसांपासून संपूर्ण संकलन बंदच आहे. शासनाने दूध दर आंदोलनावर चर्चा करण्यासाठीची बैठक पुढे ढकलली आहे. तोडगा निघाल्याशिवाय दूध संकलन करणे धाडसाचे आहे. लवकर तोडगा निघावा ही अपेक्षा.
-विनायकराव पाटील
अध्यक्ष, सहकारी- खासगी दूध उत्पादक समिती