सोलापुरातील 'सिव्हिल'च्या उपचारावर माता समाधानी; मात्र चांगल्या संवादाची अपेक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 12:43 PM2021-01-16T12:43:38+5:302021-01-16T12:43:50+5:30
सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयाच्या (सिव्हिल हॉस्पिटल ) उपचारावर माता समाधानी असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत आढळून आले. ...
सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयाच्या (सिव्हिल हॉस्पिटल) उपचारावर माता समाधानी असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत आढळून आले. डॉक्टरांकडून व्यवस्थित उपचार होत असल्याची प्रतिक्रिया मातांनी दिली.
बाळाला रुग्णालयात प्रवेश दिल्यानंतर लगेचच उपचारास सुरुवात करण्यात येते. एखाद्या चाचणीचा अहवाल काय आहे, हेदेखील सांगण्यात येते. बाळावर आयसीयूमध्ये उपचार होत असल्यास गरजेपुरते पालकांना बोलावले जाते. यासाठी साऊंड सिस्टिमचा वापर करण्यात येत आहे. दिवसा व रात्रीदेखील डॉक्टर व परिचारिका या वॉर्डमध्ये उपचारासाठी उपस्थित असतात, असे उपचार घेत असलेल्या बाळांच्या मातांनी सांगितले.
फक्त सोलापूर शहरच नव्हे तर सोलापूर जिल्हा व उस्मानाबाद, लातूर, कर्नाटक येथूनही पालक हे आपल्या बाळाला घेऊन उपचारासाठी येत आहेत. एकूणच रुग्णालयाकडून चांगले उपचार करत असल्याचे पाहणीतून दिसले.
डॉक्टरांचा चांगला संवाद साधण्यावर भर असतो. बाळाला काय झाले, हे सांगतो. एखाद्या तपासणीचा अहवाल आल्यानंतर काय करणार आहोत, याची माहिती देण्यात येते. एका शिफ्टमध्ये मराठी आणि अमराठी डॉक्टरांची नेमणूक केली जाते. यामुळे बाळाच्या आई-वडिलांशी योग्य संवाद साधता येतो. हिंदी किंवा इतर भाषिक डॉक्टर उपचार करत असल्यास मराठी डॉक्टरांनी बाळाच्या पालकांना समजावून सांगावे, अशा सूचना डॉक्टरांना दिल्याचे बालरोग विभागप्रमुख डॉ. शाकिरा सावस्कर यांनी सांगितले.
आमचे बाळ आधी ऑक्सिजनवर होते. त्याच्यावर उपचार करण्यात येत आहेत. पोटामध्ये संसर्ग झाल्याने तो आजारी होता. प्रकृती अधिकच बिघडली होती. सिव्हिलमधील डॉक्टरांनी चांगले उपचार केल्याने आता त्याच्या तब्येतीत सुधार होत असून ऑक्सिजनवरून काढण्यात आले आहे.
- काजल किरसावळगी
आमच्या बाळाची वाढ पूर्ण झाली नाही. त्यामुळे त्याच्यावर उपचार करण्यात येत आहेत. बाळाच्या तब्येतीविषयी माहिती सांगितली जाते. दिवसा-रात्री देखील डॉक्टर काळजी घेताना दिसतात. आम्ही नसलो तरी काही अडचण येत नाही. फक्त डॉक्टर व परिचारिका या संवाद व्यवस्थित साधत नाहीत.
- अर्चना डोळे
आम्ही जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून आलो आहोत. तिथे चांगले उपचार होत नसल्याने आमच्या डॉक्टरांनी सिव्हिलला जाण्याचा सल्ला दिला. त्यानुसार आम्ही लगेच सोलापुरात आलो. येथे चांगले उपचार मिळत आहेत. उपचार देत असताना आतापर्यंत तरी कोणतीही अडचण आलेली नाही.
- मोहिनी गायकवाड
बाळ आमच्याकडे आल्यानंतर लगेच बेड उपब्ध करून दिले जाते. गरजेचे प्राथमिक उपचार करण्यात येतात. तपासणीनंतर बाळाला काय झाले, हे त्यांच्या आई-वडिलांना समजावून सांगतो.
- डॉ. शाकिरा सावस्कर, बालरोग विभागप्रमुख, शासकीय रुग्णालय