सोमवारी सकाळी ११:३० वाजता रासपाचे पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख ज्ञानेश्वर सलगर व जिल्हा संपर्क प्रमुख दिलीप गडदे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते एकत्र आले. प्रथम अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन नगरपरिषदेच्या कार्यालयाकडे माढा रस्त्यावरील चिखल बकेटमध्ये गोळा करत करत निषेध मोर्चा काढला. मोर्चा गेटजवळ आला त्यावेळी बाहेरूनच निवेदन द्या अशी भूमिका उपस्थित पोलिसांनी घेतली व गेट बंद केले.
यावेळी मोर्चेकरी आक्रमक झाले आणि गेट ढकलत नगरपरिषदेच्या कार्यालयात गेले. मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांच्या केबिनसमोर एकत्र येऊन घोषणाबाजी केली. बकेटमधील चिखल फेकला, यादरम्यान मुख्याधिकारी वारंवार गैरहजर राहत असल्याने त्यांचा निषेध म्हणून त्यांच्या पाटीला चिखल लावण्यात आला. एक तास हे आंदोलन सुरू होते. यादरम्यान नगराध्यक्ष समीर मुलाणी आपल्या केबिनमध्ये बसून होते. पोलिसांनी मुख्याधिकारी आणि नगराध्यक्षांचे केबिन बाहेरुन बंद केले.
यावेळी आंदोलनात पश्चिम महाराष्ट्र प्रभारी ज्ञानेश्वर सलगर,जिल्हा संपर्क प्रमुख दिलीप गडदे, माढा विधानसभा अध्यक्ष धनाजी कोकरे, माढा तालुका अध्यक्ष, शहराध्यक्ष अभिजित सोलनकर, महिला आघाडी तालुकाध्यक्ष वैभवी भिसे, प्रियांका वाघमोडे, बजरंग सलगर, शिवाजी वाघमोडे, आप्पाजी काळे, अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष गुलाब दस्तगीर खान, सोमनाथ देवकाते, बालाजी गायकवाड, सागर होनमाने, रिपाइंचे जितेंद्र गायकवाड, विनायक गायकवाड, संकेत होनमाने, शिवाजी सोनवणे, बंटी हानवते आदी सहभागी झाले होते.
----
पोलिसांची मध्यस्थी, लेखी आश्वासन
यावेळी पोलीस निरीक्षक चिमणाजी केंद्रे यांनी मध्यस्थी करीत कार्यालयीन प्रमुख अतुल शिंदे यांच्याकडून लेखी आश्वासन मोर्चेकऱ्यांना दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.
-----
रासपाचे सोमवारचे आंदोलन हे मुख्याधिकाऱ्यांच्या गैरहजेरी विरोधात होते. आपल्या शहरातील रस्त्यासाठी सध्या मंत्रालयात मुख्यमंत्र्यांकडे सुमारे ७० कोटींच्या निधीची मागणी केली आहे. त्याची फाईल बनविणे सुरू आहे. त्यासाठी मुख्याधिकारी हे मुंबईत थांबून पाठपुरावा करीत आहेत. लवकरच शहरातील रस्ते हे सुंदर होणार आहेत. त्यासाठीच आम्हीही प्रयत्न करीत आहोत.
- समीर मुलाणी,नगराध्यक्ष, कुर्डूवाडी
-----