ही घटना ३० मार्च रोजी घडली असून, याबाबत मादन हिप्परगा येथील पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार हिरोळी येथील मल्लिनाथ वाडेद (वय-३०) व मयत नागप्पा वाडेद (वय-४०, दोघे रा. हिरोळी) यांच्यात २५ वर्षांपासून शेतीचा बांध व वहिवाटीवरून वाद होता. ३० मार्चपासून मयत नागप्पा हा बेपत्ता झाला होता. त्यांच्या नातेवाइकांनी हिप्परगा येथील पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यावरून पोलीस तपास करीत असताना खबऱ्यामार्फत मयताचा खून झाल्याचा सुगावा लागला. त्यावरून मल्लिनाथ यास १ एप्रिल रोजी ताब्यात घेतले. त्याला पोलिसी खाक्या दाखवला. यावरून त्याने ३० मार्च रोजी खून केल्याचे माहिती पोलिसांना दिली. या अनुषंगाने तपासाची सूत्रे फिरवली असता नागप्पाचे प्रेत अक्कलकोट शहराजवळील किणीरोड येथे भरमशेट्टी यांच्या जुन्या विहिरीत टाकल्याचे सांगितले.
तपासाला दिशा मिळताच कर्नाटक पोलीस गुरुवारी सकाळी अक्कलकोटला पोहोचले. त्यांनी विहिरीतील प्रेत ताब्यात घेतले. ग्रामीण रुग्णालयात शविच्छेदन करून नातेवाइकांच्या ताब्यात दिले. रात्री उशिरा त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.
याकामी अक्कलकोट येथील उत्तर पोलीस ठाण्याचे सपोनि. विलास नाळे, अंमलदार अंगद गीते, विलास सुरवसे, राम चौधरी यांनी भेट देऊन कर्नाटक पोलिसांना मदत केली.
-----
प्रेताचे तुकडे पोत्या भरून विहिरीत टाकले
आरोपीने नागप्पाचे धारधार शस्त्राने तुकडे तुकडे केले. ते दोन पोत्यांत भरले. रातोरात आणून अक्कलकोट शहराजवळील जुन्या किणी रोडवरील भरमशेट्टी यांच्या जुन्या विहिरीत टाकले. पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने हे कृत्य केले. कर्नाटकातील मादन हिप्परगा येथील पोलिसांनी मल्लिनाथ वाडेद याला खाकी वर्दीचा दम भरताच त्याने घटनाक्रम सांगितला. त्यावरून खुनाचा तपास लागल्याचे सहायक पोलीस निरीक्षक विलास नाळे यांनी सांगितले.