सिद्धरामेश्वर भक्तांच्या घरी नंदीध्वज पूजनाची लगबग; पारंपरिक हुग्गीसह आता प्रसादात बंगाली मिठाई, ढोकळा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2019 12:18 PM2019-12-13T12:18:44+5:302019-12-13T12:21:28+5:30
सेवेकºयांसह आप्तेष्टांनाही निमंत्रण; पूजेच्या वेळी आरासही केली जातेय; दररोज दीडशे भाविकांच्या घरी पूजा
यशवंत सादूल
सोलापूर : ग्रामदैवत सिद्धरामेश्वरांच्या यात्रेतील योगदंडाचे प्रतीक असलेल्या नंदीध्वजाचे पूजन पंचक्रोशीतील घराघरांत होत आहे. दररोज सरासरी दीडशे ठिकाणी नंदीध्वजांचे पूजन होत आहे. काळानुरूप आता प्रसादाच्या ताटामध्ये पारंपरिक हुग्गी, हरभरा डाळीच्या चटणीबरोबरच बंगाली मिठाई, खमण ढोकळा अन् पंजाबी भाज्यांचाही समावेश झाला आहे. ज्या भाविकांच्या घरामध्ये भोजनाऐवजी केवळ उपाहार दिला जातो तेथेही पोहे, सुशीला या पारंपरिक खाद्यपदार्थांसह शाकाहारी पुलाव, कच्छी दाबेली अन् पूर्व भागातील स्पेशल मेन्यू पुलहोरा दिला जात असल्याचे निदर्शनास आले.
शहराच्या विस्तारीकरणामुळे आणि सिद्धेश्वर भक्तांची कुटुंबंही विभक्त झाल्यामुळे भाविकांच्या पूजेच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे यात्रेपूर्वी सर्वच भक्तांच्या घरासमोर पूजा व्हावी, यासाठी मानकरी नोव्हेंबर महिन्यापासून पूजेसाठी नंदीध्वज सज्ज ठेवतात. योगदंडाचे प्रतीक असलेल्या नंदीध्वजाचे यात्राकाळात मिरवणूक मार्गावर लांबूनच दर्शन होते. मात्र ते आपल्या घरासमोर आणून त्याचे पूजन करण्यात भक्त धन्यता मानतात.
विधिवत पूजनानंतर देण्यात येणाºया हुग्गी, चपाती, वांग्याची भाजी, हरभरा डाळीची चटणी, शेंडगी (तिखट पुरी), भात, आंबरा (आंबट गोड कढी) या पारंपरिक प्रसादाबरोबरच मागील दोन-तीन वर्षांपासून या मेन्यूत बदल झाला आहे. बंगाली मिठाईसह पंजाबी डिश, पावभाजी, सामोसे, चिवडा, गुलाब-जामून, गाजर हलवा, अंजीर रबडी, शाकाहारी पुलाव पदार्थांचाही समावेश झाल्याचे दिसून आले.
अनेक हौशी भाविक पूजनाच्या ठिकाणी जिथे नंदीध्वज उभे केले जातात तिथे फुलांची आकर्षक आरास, रांगोळीच्या पायघड्या घालून परिसर सुशोभित करतानाही दिसून आले.
सुलाखे परिवारातर्फे शाही प्रसाद
- रेल्वे लाईन्स येथील भीमाशंकर सुलाखे परिवाराकडून फुलांची आकर्षक सजावट करीत मंगलमय वातावरणात पूजन करण्यात आले. यंदा पूजेचे आठवे वर्ष असून, दरवर्षी दत्त जयंतीला त्यांच्याकडे नंदीध्वज पूजन होते. त्यांच्या अंगणात औदुंबराचे झाड असून, दत्त जयंतीच्या दिवशी सजावट करून पूजा करण्यात आली. गेल्या आठ वर्षांपासून आम्ही पूजा करीत असल्याचे भीमाशंकर सुलाखे यांनी सांगितले. पूजेनंतर देण्यात येणारा प्रसाद एक शाही भोजनच होते. दत्त जयंतीला घरी येणारा पाहुणा तृप्त होऊन जावा, या उद्देशाने दरवर्षी वेगवेगळ्या पदार्थांची मेजवानी असते. यंदा बंगाली मिठाईसह अठरा ते वीस पदार्थ मेन्यूत होते.
नंदीध्वज पूजनाचे आमंत्रण
- आपल्या घरी पूजनाचा दिवस नंदीध्वजधारक मास्तरांकडून ठरवून घेतला जातो. त्यांच्याकडूनच सर्व नंदीध्वजधारकांना निमंत्रण दिले जाते. पाहुणे, मित्रमंडळींना घरच्या मंडळींकडून निमंत्रण दिले जाते. ठरलेल्या वेळी आरती होते. त्यावेळी सर्व जण उपस्थित असतात.
हलत्या मूर्तींचा देखावा
- नंदीध्वज पूजनाच्या ठिकाणी यात्रेतील वेगवेगळ्या प्रसंगांचे देखावे उभे करून यात्रेचा माहोल तयार करण्यात येत आहे. सुलाखे परिवाराकडून सातही नंदीध्वज गोल फिरतानाचा हालत्या मूर्तींचा देखावा सादर करण्यात आला. काही ठिकाणी लहान नंदीध्वजाच्या प्रतिकृतीची सजावट करण्यात आली.
शहर विस्तारामुळे बहुतेक भक्तगण हद्दवाढ भागात राहावयास गेले आहेत. प्रत्येक ठिकाणी पूजेला नंदीध्वज घेऊन जाणे व आणण्यासाठी लागणारा वेळ व त्यातून नंदीध्वज पेलण्याचा सराव करण्यासाठीचा वेळ यांची सांगड घालत दररोज एका नंदीध्वजाचे सात ते आठ ठिकाणी पूजन होत आहे. अठरा नंदीध्वज सरावासाठी असून, सरासरी दीडशे ठिकाणी त्यांचे पूजन होत आहे. यात्रा जसजशी जवळ येईल त्या प्रमाणात वाढ होत प्रत्येक नंदीध्वजाचे दररोज पंधरा ते वीस ठिकाणी पूजन होते.
- राजशेखर हिरेहब्बू
यात्रेतील प्रमुख मानकरी.