सोलापूर : प्रदूषण, आजार, पौष्टिक आहाराचा अभाव यांच्यामुळे केसांच्या आरोग्यावर परिणाम होण्याचे प्रमाण वाढले आहे. केसांची योग्य काळजी न घेणे, केस कापण्याची चुकीची पद्धत, जीवनसत्त्व तसेच प्रोटीनचा अभाव यामुळे केसांच्या असंख्य समस्या निर्माण होतात. शरीराप्रमाणेच केसांनाही पोषकतत्त्वांचा पुरवठा होणे आवश्यक आहे. सुंदर आणि चमकदार केसांसाठी पौष्टिक आहाराचेही सेवन करावे, असा सल्ला डॉ. तृप्ती राठी यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिला.
‘लोकमत सखी मंच’च्या माध्यमातून ‘स्मार्ट सखी.. डिजिटल सखी’ अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. ‘लोकमत’ सखी मंच व डॉ. राठीज् यांचे द्वारका क्लिनिक स्किन, हेअर व लेसर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने, ‘माय हेअर..माय स्किन..’ या केस व त्वचाविषयक आरोग्यावर फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून डॉ. तृप्ती राठी यांनी सखींशी संवाद साधला, त्यावेळी त्या बोलत होत्या. प्रारंभी डॉ. राठी यांनी सौंदर्याविषयी माहिती दिली. पिंपल्स, व्रण, केसांच्या विविध समस्या, चेहºयावरील सुरकुत्या, वांग व काळे डाग यामुळे काही जण सतत चिंतेत असतात. चिंता न करता डॉक्टरांना ती चिंता दाखवून लवकर निदान करून घ्यावे, असा सल्ला डॉ. राठी यांनी यावेळी दिला.
याचवेळी सखींनी विचारलेल्या विविध प्रश्नांना डॉ. तृप्ती राठी यांनी समर्पक उत्तरे देऊन सखींचे समाधान केले. कोरोनाच्या काळात सखींनी स्वत:ची काळजी घ्यावी, शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे, असेही आवाहन डॉ. राठी यांनी यावेळी केले.
खानपानात बदल अन् ताणतणावामुळे केस पांढरेसध्या लहान मुलांमध्ये पांढरे केस होण्याचे प्रमाण वाढलेले आहे. चौथी, पाचवीला जाणारीही मुले, मुली केसाला वेगवेगळ्या प्रकारचे कलर लावत असल्याचे चित्र दिसत आहे. लहान वयात केस पांढरे का होतात, यावर बोलताना डॉ. तृप्ती राठी यांनी सांगितले की, पांढरे केस होण्याची दोन कारणे आहेत. त्यापैकी एक म्हणजे ताणतणाव अन् दुसरे म्हणजे खाण्यात झालेला बदल. पांढरे झालेले केस काळे करण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य तो उपचार घ्यायला हवा. शक्यतो डाय, मेहंदी अथवा कोणत्याही प्रकारचे रासायनिक द्रव्य केसाला लावू नका, असाही सल्ला डॉ. तृप्ती राठी यांनी दिला.