‘मास्क नाही तर किराणा माल नाही; काेरोना नियमांचे सोलापुरात काटेकोरपणे पालन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2022 05:53 PM2022-01-12T17:53:47+5:302022-01-12T17:53:52+5:30
दुकानदारांसमोर अनेक अडचणी
सोलापूर : कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वेगाने वाढत असताना, लसीचे दोन डोस न घेता दुकानात बसणाऱ्या व्यापारी, हॉटेल कर्मचारी आणि विनामास्क फिरणाऱ्या दुचाकीस्वारांवर प्रशासनाने कारवाई केली आहे. याच पार्श्वभूमीवर दुकानदारांनी आपली जबाबदारी लक्षात घेऊन शहरात दुकानदारांनी आपल्या काैंटरवर, ‘मास्क नाही तर किराणा माल नाही’ असे पोस्टर्स चिकटवलेले दिसून येत आहेत.
शहर काेराेनामुक्त करण्यासाठी सर्वांनी नियमांचे काटेकाेरपणे पालन करणे आवश्यक आहे, तर मास्कचा वापर न करणाऱ्या ग्राहकांना १ हजार रुपये दंड, तर ते ज्या दुकानात अथवा आस्थापनेत असतील, तेथील दुकानदार अथवा संबंधितांना १० हजार रुपये दंड करण्याचा निर्णय राज्य सरकारने नुकताच जाहीर केला आहे. दुकानात ग्राहकासोबत आणखी दोन-तीन लोक असतात. प्रत्येकजण मास्क घालतोच असे नाही. त्यामुळे ग्राहकाला थेट विरोध करता येत नाही. विरोध केला, तर 'यांना माल विकायचा नाही' असे म्हणून ग्राहक निघून जातात. यामुळे ग्राहक तुटण्याची भीती व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
---
ना दुकानदारांना मास्क ना ग्राहकांस
दुकानदारांनी स्वत: मास्क लावणे अनिवार्य आहे. शिवाय दुकानात येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला मास्क लावल्याशिवाय दुकानात प्रवेश देऊ नये. पाचपेक्षा अधिक जणांना दुकानात प्रवेश देऊ नये. असे असले तरी देखील काही गर्दीच्या ठिकाणी फेरीवाले, ग्राहक, दुकानदार विनामास्क निदर्शनास येत आहेत.
---
ग्राहक ऐकतच नाहीत
नागरिकांनी नियम पाळणे गरजेचेच आहे. आम्ही व्यावसायिकही सर्व नियमांचे पालन करतो. ग्राहकांना मास्क वापरण्यास सांगतोच. मात्र, अनेक ग्राहक मास्कचा वापर करीत नाहीत. त्यांना परत पाठविल्यानंतर ते पुन्हा येत नाहीत.
- शफिक शेख, दुकानदार
कोरोना व्हायरस रोखण्यासाठी सर्वानीच सजगता दाखविण्याची गरज आहे. त्यासाठी प्रत्येकाने त्याचे पालन केले पाहिजे. त्यामुळे आपण आपल्यापासूनच ही सुरुवात केली आहे. ग्राहक माल घेण्यास आल्यास त्यांना आपण मास्क किंवा रूमाल लावून या, असे सांगतो.
- राहुल पाटील, दुकानदार
---
ग्राहक म्हणतात...
घरी लागणाऱ्या अत्यावश्यक वस्तू किराणा, दूध आणण्यासाठी बाहेर जावे लागते. बाहेर पडल्यानंतर स्वतःला सुरक्षित ठेवणे तेवढेच गरजेचे आहे. म्हणून मी मास्कचा वापर करतो. मास्क असल्याने मी सुरक्षित असल्याची खात्री होते. सर्वांनी मास्क लावूनच बाहेर पडावे.
- अक्षय चौगुले, सोलापूर
घरासमोर भाजी खरेदी करण्यासाठी किंवा किराणा दुकानात काही वस्तू आणण्यासाठी मी मास्कचा वापर करते. मास्क वापरल्याने नक्कीच मला सुरक्षित असल्याचे वाटते. प्रत्येकाने मास्क वापरून सुरक्षित राहावे, जेणेकरून रुग्णांची संख्या कमी होईल
- मुस्कान सय्यद, गृहिणी