भटक्या समाजातील कलाकार मंडळी तालुक्यात बरीच आहेत. तसेच शेकडो अंध अन् दिव्यांगही आहेत. दिवसभर जे काही मिळेल त्यावर कुटुंबीयांची उपजीविका करत असतात. गतवर्षी तब्बल आठ ते नऊ महिने लॉकडाऊन व आता पुन्हा गेल्या पंधरा दिवसांपासून कोरोनामुळे कडक निर्बंधामुळे या मंडळींना बाहेर निघणे मुश्कील बनले आहे. गल्लीबोळातून फिरताना कोरोनाच्या भीतीने मदत करणे दूरच पण दारासमोरसुद्धा कोणी उभा राहू देत नाही, अशी बिकट अवस्था निर्माण झाली आहे.
करमाळा शहरापासून एक किलोमीटर अंतरावर मौलालीनगर येथे भटक्या समाजाची वसाहत आहे. तेथे १५० कुटुंबे आहेत. या कुटुंबातील काही युवक हॉटेल, खानावळ, गॅरेजमध्ये मजुरीचे काम करतात. पण कोरोना काळात लॉकडाऊन असल्याने रोजगार गेला आहे. वनविभागाच्या नियमामुळे प्राण्यांचा खेळ करता येत नाही. ग्रामीण भागात रानटी औषधे विकणे, भविष्य सांगणे, खेळणी-भांडी विकणे, गोधडी शिवणे, पोलिसांचा वेष परिधान करून करमणूक करणे यावर आपली उपजीविका भागविली जायची, पण सर्वत्र व्यवहार बंद असल्याने त्यांना अडचणीचा सामना सध्या करावा लागत आहे.
कोट ::::
कोरोनामुळे सर्वत्र व्यवहार बंद असून, कोरोनाची भीती निर्माण झाल्याने आमचे हाल सुरू झाले आहेत. आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून कोणीही मदत करत नाहीत. रेशनवरील धान्यही मिळालेले नाही. आता खायचे काय व जगायचे कसे?
- फत्तू मदारी, मौलालीमाळ.