शहरात मदारी, जोगी, गोसावी, भिल्ल, उंटवाले, पारधी, फकीर, पोतराज या भटक्या समाजातील भिक्षेकरू तालुक्यात आहेत. शेकडो आंधळे, पांगळे व अपंग आहेत. दररोज सकाळी दारोदारी जाऊन ईश्वर,अल्लाहचे नामस्मरण करून भिक्षा मागून यातून जे काही मिळेल त्यावर कुटुंबीयांची उपजीविका असते. गतवर्षी तब्बल आठ ते नऊ महिने लॉकडाऊन व आता पुन्हा गेल्या पंधरा दिवसापासून कोरोनामुळे कडक निर्बंधामुळे भिक्षेकऱ्यांना भिक्षा मागण्यासाठी बाहेर निघणे मुश्कील बनले आहे. गल्लीबोळातून दारोदार जाऊन भिक्षा मागितली तर कोरोनाच्या भीतीने भिक्षा देणे दूरच पण दारासमोरसुद्धा कोणी उभा राहू देत नाही, अशी बिकट अवस्था निर्माण झाली आहे.
करमाळा शहरापासून एक कि.मी. अंतरावर मौलालीनगर येथे भटक्या मदारी समाजाची वसाहत आहे. तेथे भिक्षा मागणारे दीडशे कुटुंब आहेत. या कुटुंबातील काही युवक हॉटेल, खानावळ, गॅरेजमध्ये मजुरीचे काम करतात पण कोरोनात लॉकडाऊन असल्याने रोजगार गेला आहे. मदाऱ्यांना वनविभागाच्या नियमामुळे सापाचा खेळ करता येत नाही. भिल्ल,जोगी,गोसावी,पोतराज हे ग्रामीण भागात रानटी औषधे विक्री, भविष्य सांगणे, खेळणी,भांडी विक्री, गोधडी शिवणे, पोलिसांचा वेष परिधान करून करमणूक करून भिक्षा मागून आपली उपजीविका भागवतात, पण सर्वत्र व्यवहार बंद असल्याने त्यांना अडचणीचा सामना सध्या करावा लागत आहे.
-----
कोरोनामुळे सर्वत्र व्यवहार बंद असून, कोरोनाची भीती निर्माण झाल्याने आमचे हाल सुरू झाले आहेत. आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. गेल्या पंधरा दिवसापासून भीकही कोणी घालत नाही. रेशनवरील धान्यही मिळालेले नाही. आता खायचे काय व जगायचे कसे.
- फत्तू मदारी, मौलालीमाळ.
----२९करमाळा-मदारी
शहरात भीक मागताना फत्तू मदारी.