पुणे अन् बल्लारीहून वेळेत ऑक्सिजन मिळेना; सोलापुरातील प्रशासनाची चिंता वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 02:08 PM2021-05-05T14:08:21+5:302021-05-05T14:08:27+5:30
विभागीय आयुक्तांकडे साकडे: शहरातील हॉस्पिटल प्रशासनाला चिंता
सोलापूर : मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी होत असल्याने सोलापूर जिल्ह्यात ‘प्राणवायू’साठी रोजच धावाधाव होत आहे. बल्लारी तसेच पुणे येथून सोलापूरला प्राणवायूचा पुरवठा होत असून, दोन्ही ठिकाणांहून वेळेवर ऑक्सिजनचा पुरवठा होता होईना. त्यामुळे रोज पहाटे चार ते पाचपर्यंत ऑक्सिजनचे वितरण सुरू आहे. सोलापूरला होणारा ऑक्सिजनचा पुरवठा नियोजित वेळेनुसार व्हावा, असे साकडे विभागीय आयुक्तांना घालण्यात आले आहे. विभागीय आयुक्तांनी या प्रश्नी लक्ष देऊन ऑक्सिजनचा पुरवठा व्हावा, अशी विनंतीही त्यांच्याकडे करण्यात आली आहे.
सोलापूर जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्तांकडे याबाबत पाठपुरावा सुरू ठेवला आहे. मंगळवारी सोलापूरला ३८ मेट्रिक टन प्राणवायूचा पुरवठा झाला. रात्री उशिरापर्यंत बल्लारी आणि पुण्याहून प्राणवायूचे टँकर येत राहिले. त्यामुळे पहाटेपर्यंत वितरण प्रणाली राबवताना अधिकाऱ्यांची दमछाक झाली.
मंगळवारी सोलापूरला ४९ मेट्रिक टन प्राणवायूची आवश्यकता होती, तर दोन्ही ठिकाणांहून फक्त ३८ मेट्रिक टनचा पुरवठा झाला. उर्वरित ११ टन प्राणवायुसाठी अधिकार्यांची रात्री उशिरापर्यंत धावपळ सुरू होती. रविवारी २ मे रोजी सोलापूरला फक्त अठरा टनचा पुरवठा झाला. त्यामुळे सोमवारी दिवसभर प्राणवायूकरिता सोलापूर जिल्ह्यात आणीबाणीसारखी स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे प्राणवायूचे रिकामे सिलिंडर लातूरला पाठवून प्राणवायू मागवले.
पुरवठा केंद्रांवर अधिकारी तैनात
सोलापूर जिल्ह्यातील प्राणवायू निर्मिती केंद्रावर तसेच पुरवठा केंद्रावर जिल्हा प्रशासनाने अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. सोलापूर जिल्ह्यात प्राणवायूचा तुटवडा आहे. त्यामुळे येथील प्राणवायू परजिल्ह्यात किंवा परप्रांतात जाऊ नये, याची दक्षता प्रशासनाकडून घेतली जात आहे. प्राणवायू पुरवठा केंद्रावर येणाऱ्या प्रत्येक गाडीचा आणि केंद्रातून बाहेर पडणाऱ्या प्रत्येक गाडीचा हिशोब सदर अधिकारी ठेवत आहेत. विशेष म्हणजे प्राणवायूकरिता रोजच रुग्णालयाकडून मोठा दबाव येत आहे. जिल्ह्यातील मोठ्या रुग्णालयातील प्रतिनिधी सकाळी आणि संध्याकाळी जिल्हा प्रशासनाकडे येऊन ठाण मांडत आहेत. प्राणवायूकरिता दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात मागणी आणि दबाव येत असल्याने वितरण करता करता प्रशासनाची डोकेदुखी वाढत आहे.