कुळाच्या जमिनीची संगनमताने विक्री केल्याप्रकरणी मंद्रूपचे तलाठी आणि मंडल अधिकाऱ्याना नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:29 AM2021-06-16T04:29:54+5:302021-06-16T04:29:54+5:30

मंद्रूप येथील गट क्रमांक २५७/५ ही १३ हेक्टर८४ आर (अंदाजे ३० एकर) मळसिद्ध शिवानंद मुगळे आणि त्यांचे बंधू ...

Notice to Talathi and Mandal officers of Mandrup regarding sale of clan land in connivance | कुळाच्या जमिनीची संगनमताने विक्री केल्याप्रकरणी मंद्रूपचे तलाठी आणि मंडल अधिकाऱ्याना नोटीस

कुळाच्या जमिनीची संगनमताने विक्री केल्याप्रकरणी मंद्रूपचे तलाठी आणि मंडल अधिकाऱ्याना नोटीस

Next

मंद्रूप येथील गट क्रमांक २५७/५ ही १३ हेक्टर८४ आर (अंदाजे ३० एकर) मळसिद्ध शिवानंद मुगळे आणि त्यांचे बंधू मिथुन शिवानंद मुगळे यांनी खरेदी केली. शेतजमिनीच्या इतर हक्कात कूळ सुभाष कोंडीबा टेळे व इतर यांची वहिवाट असल्याचा स्पष्ट उल्लेख आहे. महाराष्ट्र कूळवहिवाट कायद्यानुसार खरेदी-विक्रीसह कोणतेही व्यवहार करण्यापूर्वी शासनाची मंजुरी घेणे अपेक्षित आहे. कोणतीही पूर्वपरवानगी न घेता या शेतजमिनीचा व्यवहार करण्यात आला आहे.

या खरेदी-विक्री व्यवहारानंतर खरेदीखतानुसार फेरफार क्र १४६३९ दि.२२ एप्रिल २०२१ रोजी नोंद घेण्यात आली. सदरची शेतजमीन कुळाची असताना देखील मंद्रूपचे तलाठी निंगप्पा कोळी आणि मंडल अधिकारी राजकुमार घोटाळे यांनी कोणतीही खातरजमा न करता संगनमताने नोंद मंजूर केली. ही नोंद प्रमाणित केली. यात तलाठी आणि मंडल अधिकाऱ्यांनी अटी व शर्तींचा भंग केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

-------

२४ तासांत खुलाशाचा आदेश

कूळ कायद्याचा भंग केल्याप्रकरणी मंद्रूपच्या अप्पर तहसीलदार उज्ज्वला सोरटे यांनी तलाठी निंगप्पा कोळी आणि मंडल अधिकारी राजकुमार घोटाळे यांना शिस्तभंगाची नोटीस बजावली आहे. या प्रकरणाचा २४ तासाच्या आत खुलासा करा, खुलासा दिलेल्या मुदतीत सादर केला नाही अथवा तो समाधानकारक वाटला नाही तर उभयतांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवण्याची त्यांना तंबी नोटिसीत देण्यात आली आहे.

----

प्रकरण खूपच गंभीर आहे. मंद्रूपच्या तलाठी कार्यालयाची दप्तर तपासणी करताना हे प्रकरण आढळून आले आहे. याबाबत विचारणा केली असता तलाठ्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळेच त्यांना शिस्तभंगाची नोटीस बजावली आहे.

- उज्ज्वला सोरटे, अप्पर तहसीलदार,

मंद्रूप अप्पर तहसील कार्यालय

---------

या प्रकरणात माझा कसलाच दोष नाही. सदरची फेरफार नोंद घेऊन ती प्रमाणित करताना मी वरिष्ठांना कल्पना दिलेली आहे. माझ्यावरील आरोपाबाबत लेखी खुलासा करताना वस्तुस्थिती त्यात नमूद करणार आहे.

-निंगप्पा कोळी, गाव कामगार तलाठी, मंद्रूप

----------

तहसीलदारांनी अर्वाच्च शिवीगाळ केल्याची तक्रार

अप्पर तहसीलदार उज्ज्वला सोरटे यांनी मोबाईलवरून मला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली आहे. कार्यालयाची माझ्या अपरोक्ष झडती घेतली आहे. फोनवरून मला दमदाटी केली असून, त्यांनी माझ्याशी अपमानास्पद वागणूक दिल्या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, अशी लेखी तक्रार निंगप्पा कोळी यांनी जिल्हा तलाठी संघटनेकडे केली आहे. यावर संघटना काय भूमिका घेणार हे स्पष्ट झाले नाही.

--------

मला अप्पर तहसीलदारांची नोटीस मिळाली आहे. माझा लेखी खुलासा त्यांना देणार आहे. याविषयी तोंडी प्रतिक्रिया देणे मला उचित वाटत नाही. समक्ष बोलेन.

- राजकुमार घोटाळे,

मंडल अधिकारी , मंद्रुप

----

Web Title: Notice to Talathi and Mandal officers of Mandrup regarding sale of clan land in connivance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.