आप्पासाहेब पाटील, सोलापूर : प्राथमिक लेआऊट मंजूर असलेल्या भूखंडधारकांना आता नोंदणीकृत आर्किटेक्ट-इंजिनिअरकडून जागेची मोजणी करून घेऊन महापालिकेकडून बांधकाम परवाना वा बांधकामाचे नियमितीकरण करून घेता येणार आहे. यासंदर्भातील परिपत्रक महापालिका आयुक्त शीतल तेली-उगले यांनी काढले आहे. भूखंडधारकाच्या भूखंडाची मोजणी नोंदणीकृत आर्किटेक्ट वा इंजिनिअरमार्फत करून घेऊन लगतच्या भूखंडधारकांच्या सह्या घेणे बंधनकारक आहे, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, शहरातील अनेक भूखंडांच्या प्राथमिक लेआऊटला मान्यता आहे, पण अशा भूखंडांबाबत रीतसर नोंदणी, एनए करून घेऊन अंतिम लेआऊटला मान्यता घेण्याचे काम बिल्डर्सकडून झाले नाही. या पार्श्वभूमीवर अशा बिल्डर्सची जागांची विक्री केली. अशा भूखंडासंदर्भात अनेक वाद निर्माण झाल्याने तसेच तक्रारी असल्याने महापालिकेकडून गत दोन-तीन वर्षांपासून अशा भूखंडातील प्लॉटधारकांना बांधकाम परवाना देण्याचे तसेच परवानगीशिवाय केलेल्या बांधकांमाचे नियमितीकरण करण्याचे काम थांबविण्यात आले होते.
अशा भूखंडांबाबत संबंधित प्लॉटधारकांनी नगर भूमापन कार्यालयाकडून वैयक्तिक मोजणी करून घ्यावी, असा सल्ला महापालिकेने दिला होता, मात्र नगर भूमापन कार्यालयाचे वैयक्तिकऐवजी संपूर्ण लेआऊटची मोजणी करून घ्यावे, असे म्हणणे आहे. यामुळे बांधकाम परवाना, नियमितीकरणाचा गुंता सुटत नव्हता. या पार्श्वभूमीवर महापालिकेने यावर तोडगा काढणारे परिपत्रक काढले. यानुसार वैयक्तिक भूखंडधारकांना बांधकाम परवाना घेण्यासाठी वा बांधकामाचे नियमितीकरण करून घेण्यासाठी नोंदणीकृत आर्किटेक्ट-इंजिनिअरकडून जागेची मोजणी करून घ्यावी लागणार आहे.
खात्री करून अहवाल सादर करावा
मोजणीनंतर आर्किटेक्ट- इंजिनिअर व जागा मालकांकडून प्रतिज्ञापत्र घेणे बंधनकारक आहे. तसेच त्या ठिकाणचे लेआऊटतील रस्ते , खुली जागा मंजूर रेखांकनाप्रमाणे जागेवर असल्याची खात्री संबंधित अवेक्षक करणार आहेत व तसा अहवाल ते देणार आहेत. लेआऊटतील रस्ते, खुली जागा मंजूर लेआऊटप्रमाणे खुले व अतिक्रमण विरहित असल्याबाबत संबंधित अवेक्षकांनी खात्री करून तसा अहवाल सादर करणे आवश्यक आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"