सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयामध्ये (सिव्हिल) सीबी नॅट मशीन दाखल झाली आहे. या यंत्रामुळे फक्त दोन ते अडीच तासांमध्ये कोरोना आजाराचे निदान होणार आहे. गंभीर रुग्णांचा अहवाल लवकर येण्यासाठी या यंत्राचा उपयोग होईल. सोलापूर महापालिकेतर्फे ही मशीन सिव्हिलला देण्यात आली आहे.
सीबी नॅट मशीनद्वारे क्षयरोगाची तपासणी केली जाते. या मशीनद्वारे आता कोरोनाची चाचणी देखील घेण्यात येणार आहे. या मशीनचे वैशिष्ट्य म्हणजे यात स्वॅब टाकल्यानंतर मानवी हस्तक्षेपाशिवाय कमी वेळेत आजाराचे निदान होते.
या मशीनमध्ये चाचणी करण्यासाठी आवश्यक असलेले ५०० किट देखील आणण्यात आले आहेत. या यंत्रामधून एकाचवेळी १६ जणांचे अहवाल मिळवता येऊ शकतात. मशीनवर दिवसभर तंत्रज्ञांनी काम केल्यास २०० ते ३०० जणांचे अहवालही मशीन देऊ शकते. शहरात तपासणी किटचे प्रमाण वाढवून लवकरात लवकर अहवाल येण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. या प्रकारची व्यवस्था आठवडाभरात सुरू करणार असल्याचे पालकमंत्री भरणे यांनी सांगितले होते. या अनुषंगानेही तयारी सुरू करण्यात आली आहे.
सीबी नॅट मशीन म्हणजे काय?- क्षयरोगाचे निदान करण्यासाठी कफ किंवा शरीराच्या अन्य भागातून फ्लूईड सॅम्पल घेतले जाते. हे सॅम्पल मशीनमध्ये टाकले जाते. याला कार्टेज बेस्ड न्यूक्लिक अॅसिड अॅम्प्लिफिकेशन टेस्ट (सीबी नॅट) असे म्हटले जाते. याद्वारे क्षयरोगाचे निदान तर होतेच. शिवाय आता या मशीनद्वारे कोरोनाचे निदानही होणार आहे. कोरोनाचे निदान करण्यासाठी प्रायमरचा वापर करण्यात येतो. पण, सीबी नॅट मशीनमधून कोरोनाचे निदान करण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या कार्टेजची गरज असते. या यंत्रामधून चार, आठ, सोळा नमुन्यांची तपासणी करता येते. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आलेल्या या मशीनमधून एका वेळी सोळा नमुने तपासता येतात.
मायक्रोबायोलॉजिस्टची गरज- कोरोनाचे निदान करण्यासाठी सिव्हिलमध्ये २४ तास (तीन शिफ्ट) काम सुरू आहे. त्यांच्याकडे असलेले मायक्रोबायोलॉजिस्ट हे निदान करण्यासाठी गुंतले आहेत. आता नवीन यंत्र आणल्याने आणखी मायक्रोबायोलॉजिस्टची गरज भासणार आहे. यासाठी जाहिरात देण्यात आली आहे. मात्र, सोलापुरात मायक्रोबायोलॉजिस्ट संख्येने फार कमी आहेत. यासाठी आता वैद्यकीय महाविद्यालयात काम करणाºया मायक्रोबायोलॉजिस्टला या कामासाठी विनंती करावी, असे पत्र जिल्हा प्रशासनाकडे देण्यात आले आहे.