सोलापूर : फताटेवाडी येथील एनटीपीसीच्या वीज निर्मितीचा दुसरा टप्पा सुरू होण्यासाठी चाचणी घेण्यात येत आहे़ या दरम्यान प्रकल्पातून मोठा आवाज होणार असल्याने परिसरातील नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही, असे निवेदन एनटीपीसीच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आले आहे.
एनटीपीसीच्या पहिल्या टप्प्यात ६६० मेगावॅट क्षमतेचे एक युनिट वर्षभरापूर्वी सुरू करण्यात आले. वीज निर्मिती होण्यापूर्वी मशिनरीची कार्यक्षमता तपासण्यासाठी चाचणी घेतली जाते. गतवर्षी अशी चाचणी घेताना मोठा आवाज येत होता़ प्रकल्पाच्या परिसरातील लोकांमध्ये भीती पसरली होती; मात्र व्यवस्थापनाने यासंदर्भात खुलासा केल्याने नागरिकांना वस्तुस्थिती समजली.
फताटेवाडी येथील एनटीपीसीचे औष्णिक वीज निर्मिती प्रकल्प दोन युनिट कार्यान्वित होणार आहे. प्रत्येकी ६६० मेगावॅट क्षमतेचे युनिट असून एकूण १३२० मेगावॅट वीज निर्मिती करण्यात येणार आहे. पहिले युनिट पहिल्या टप्प्यात गतवर्षी सुरू करण्यात आले आता दुसºया युनिटचे काम पूर्ण झाले असून त्याची चाचणी घेण्याचे काम सुरू आहे़ या दरम्यान उच्च दाबाने वाफ बाहेर सोडण्यात येणार आहे़ त्याचा मोठा आवाज होत असतो़ युनिट पूर्ण क्षमतेने सुरू होईपर्यंत ही चाचणी जवळपास महिनाभर करण्यात येणार आहे यादरम्यान दिवसभरात अधूनमधून असे मोठे आवाज होऊ शकतात व परिसरातील लोकांना त्याचा त्रास होतो आणि ध्वनिप्रदूषणही मोठ्या प्रमाणात होते़.
प्रकल्पाच्या परिसरात फताटेवाडी, होटगी, होटगी स्टेशन, आहेरवाडी या गावांचा समावेश आहे. आवाजाचा संबंधित गावातील नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी माहितीपत्रक प्रसिद्धीस दिल्याची माहिती एनटीपीसीने जिल्हा प्रशासनालाही कळवली आहे.